रोह्यांचा कळप शेतात शिरून पीक करतोय उद्‌ध्वस्त!; शेतकरी हतबल; घाटावरील चित्र

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आधीच अस्मानी संकटाला तोंड देणाऱ्या बळीराजाला वन्यप्राण्यांच्या त्रासालाही सामोरे जावे लागत आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली आणि त्यातच रोही या वन्यप्राण्याचा त्रासही वाढला आहे. वनविभागाकडे तक्रारी करूनही उपाययोजना केल्या जात नसल्याची तक्रार शेतकरी करत आहे. शेताच्या होणाऱ्या नुकसानीकडे हतबलतेने पाहण्यावाचून त्यांच्याकडे पर्यायच राहिलेला नाही. वन विभागाने नुकसान भरपाई द्यावी, अशी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः आधीच अस्मानी संकटाला तोंड देणाऱ्या बळीराजाला वन्यप्राण्यांच्या त्रासालाही सामोरे जावे लागत आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली आणि त्यातच रोही या वन्यप्राण्याचा त्रासही वाढला आहे. वनविभागाकडे तक्रारी करूनही उपाययोजना केल्या जात नसल्याची तक्रार शेतकरी करत आहे. शेताच्‍या होणाऱ्या नुकसानीकडे हतबलतेने पाहण्यावाचून त्‍यांच्‍याकडे पर्यायच राहिलेला नाही. वन विभागाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

बुलडाणा जिल्ह्यात घाटावर रोही हा प्राणी मोठ्या प्रमाणात आढळतो. घोड्यासारखा दिसणारा हा प्राणी कळपाने राहतो. एका कळपात २०० ते ३०० रोही असतात. कळप एखाद्या शेतात आला तर अवघ्या काही मिनिटांत शेतातले पीक ते खाऊन घेतात. याशिवाय पूर्ण कळपच शेतात घुसल्याने पायाखाली दबूनही शेतमालाचे मोठे नुकसान होते. रोह्यापासून पीक वाचवण्यासाठी रात्र रात्र भर शेतकऱ्यांना जागरण करावे लागत आहे. रात्री बेरात्री शेतकऱ्यांना उठून शेतात जावे लागत असल्याने घरचेही चिंतित असतात. मात्र शेतकऱ्यांची चिंता कुणालाच नाही. बुलडाणा, मोताळा, चिखली, देऊळगाव राजा, मेहकर, लोणार, सिंदखेडराजा या तालुक्यांत सर्वच गावांमध्ये रोह्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची व रोह्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.

अधिकारी म्‍हणतात…
वन्यप्राण्यांनी शेतकऱ्यांचे नुकसान केल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यानुसार पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली जाईल.

– अक्षय गजभिये, उपवनसंरक्षक बुलडाणा