लई भारी….कोरोनाच्‍या संकटात बघा धायफळचे ग्रामस्‍थ कशी जपताहेत माणुसकी!; असं चित्र हवं गावोगावी!

लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाने धायफळ (ता. लोणार) गावालाही विळखा घातला आहे. शंभरावरून पॉझिटिव्ह रुग्ण या गावात आढळले. त्यामुळे गाव हादरले. मात्र संकटाला तोंड देताना ग्रामस्थांनी एकजूट केली आहे. सुरुवातीला रुग्णांचे मनोबल उंचावून त्यांना कोव्हिड सेंटरपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी केले. त्यानंतर आता या रुग्णांची काळजी अवघे ग्रामस्थ घेत आहेत. कोरोना रुग्ण …
 

लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाने धायफळ (ता. लोणार) गावालाही विळखा घातला आहे. शंभरावरून पॉझिटिव्‍ह रुग्‍ण या गावात आढळले. त्‍यामुळे गाव हादरले. मात्र संकटाला तोंड देताना ग्रामस्थांनी एकजूट केली आहे. सुरुवातीला रुग्णांचे मनोबल उंचावून त्यांना कोव्हिड सेंटरपर्यंत पोहोचविण्याचे काम त्‍यांनी केले. त्‍यानंतर आता या रुग्‍णांची काळजी अवघे ग्रामस्‍थ घेत आहेत. कोरोना रुग्‍ण आढळला त्‍याच्‍या अवघ्या कुटुंबाला वाळीत टाकणारी गावे, शेजारी दिसून येत असताना या गावाने मात्र आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.

सर्व रुग्णांसाठी जेवण तयार करणे. ते जेवण त्यांच्यापर्यंत पोहोचवणे. त्यांना मानसिक पाठबळ देऊन या आजारातून बरे होण्यासाठी त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी ग्रामस्थांकडून त्यांना सर्वोतोपरी मदत  केली जात आहे. रुग्णांबद्दल असलेली आपुलकी आणि प्रेम पाहून ग्रामस्थांकडून मानवतेचे दर्शन घडवले जात आहे. याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आज रुग्णांना सकाळचे भोजन पुरवताना शिवछत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदूभाऊ मापारी यांच्यासोबत धायफळ येथील पं. स. सदस्य मदन सुटे, ग्रा.पं. सदस्य भगवानराव मापारी, अशोक गावडे, बिरजू राठोड, रामेश्वर जाधव यांच्यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते. गावात यापुढे रुग्‍ण आढळू नये यासाठी उपाययोजनाही हाती घेण्यात आल्या आहेत.