लग्‍नाला गेले होते, तिथून सासरवाडीला गेले…तिथेच आला “तो’ फोन…!; तसेच धावले घराकडे…

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गुरुबहिणीकडे लग्नाला गेल्यानंतर तिथून पती, मुलासह ते सासरवाडीला गेले. सासरवाडीत असतानाच १२ जुलैच्या रात्री सव्वा दहाच्या सुमारास त्यांना शंकर शेळके यांचा फोन आला… अन् त्यांच्या तोंडचे पाणीच पळाले… तसेच ते घरी धावले… पाहतात तर चोरट्याने अख्खे घर साफ केलेले… या प्रकरणी आज, १३ जुलैला पेठ (ता. चिखली) येथील शेतकरी पंढरी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः गुरुबहिणीकडे लग्‍नाला गेल्यानंतर तिथून पती, मुलासह ते सासरवाडीला गेले. सासरवाडीत असतानाच १२ जुलैच्या रात्री सव्वा दहाच्‍या सुमारास त्‍यांना शंकर शेळके यांचा फोन आला… अन्‌ त्‍यांच्‍या तोंडचे पाणीच पळाले… तसेच ते घरी धावले… पाहतात तर चोरट्याने अख्खे घर साफ केलेले… या प्रकरणी आज, १३ जुलैला पेठ (ता. चिखली) येथील शेतकरी पंढरी भागवत शेळके यांनी अमडापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

पंढरी शेळके शेती करून उदरनिर्वाह करतात. काल, १२ जुलैला सकाळी ११ ला ते त्‍यांची गुरुबहीण शारदा चांदणे यांच्‍याकडे मुंदेफळ येथे लग्नाला गेले होते. पत्नी व मुलालाही त्‍यांनी सोबत नेले. तेथून हे कुटुंब साखरखेर्डा येथे सासरवाडीला गेले. रात्री सव्वा दहाच्‍या सुमारास त्‍यांना पेठ येथून शंकर शेळके यांचा कॉल आला. त्‍यांनी तुमच्या घरी चोरी झालेली आहे, असे सांगितले. त्‍यामुळे धक्का बसलेल्या पंढरी शेळके यांनी तातडीने पत्‍नी, मुलासह पेठ गाठले. घरातील लोखंडी पेटीत ठेवलेले चाळीस तोळ्याचे चांदीचे दागिने (किंमत ३० हजार), तीन तोळ्यांचे कडे (किंमत २ हजार रुपये), आईचे मंगळसूत्र (अंदाजे अडीच ग्रॅम किंमत १० हजार) व नगदी २० हजार रुपये असा एकूण ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसले. घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी ही चोरी केली.