लाचखोर तलाठी, मंडळ अधिकाऱ्याला ‘ACB’ने जेवणावरून उठवले! दारू-मटनाची पार्टी झोडतानाच घेतले ताब्यात; खामगाव तालुक्यातील खळबळजनक कारवाई

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्लॉटची नोंद घेऊन त्याची फेरफार देण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच घेऊनही दारू व मटणाची पार्टी खाणाऱ्या लाचखोर मंडळ अधिकारी व तलाठ्याला बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. ही कारवाई काल, 28 मेच्या रात्री पिंप्री धनगर शिवारात (ता. खामगाव) करण्यात आली. लाखनवाड्याचा मंडळ अधिकारी विलास साहेबराव खेडेकर (52, रा. गजानन …
 
लाचखोर तलाठी, मंडळ अधिकाऱ्याला ‘ACB’ने जेवणावरून उठवले! दारू-मटनाची पार्टी झोडतानाच घेतले ताब्यात; खामगाव तालुक्यातील खळबळजनक कारवाई

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्लॉटची नोंद घेऊन त्याची फेरफार देण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच घेऊनही दारू व मटणाची पार्टी खाणाऱ्या लाचखोर मंडळ अधिकारी व तलाठ्याला बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. ही कारवाई काल, 28 मेच्या रात्री पिंप्री धनगर शिवारात (ता. खामगाव) करण्यात आली. लाखनवाड्याचा मंडळ अधिकारी विलास साहेबराव खेडेकर (52, रा. गजानन कॉलनी, खामगाव), आणि शिरला नेमानेचा तलाठी बाबुराव उखर्डा मोरे (36, रा. किन्ही महादेव ता. खामगाव) अशी लाचखोरांची नावे आहेत.

शिरला नेमाने येथील 42 वर्षीय ग्रामस्थाला प्लॉटची नोंद घेऊन त्याची फेरफार घ्यायची होती. यासाठी खेडेकर आणि मोरे यांनी त्याच्याकडे 10 हजार रुपये व दारू- मटणाच्या पार्टीची मागणी केली होती. यातील 10 हजार रुपये काल दुपारीच अधिकाऱ्यांना देण्यात आले होते व रात्री दारू व मटणाच्या पार्टीचा बेत ठरला होता. तक्रारदाराने ही माहिती ‘एसीबी’ला दिली होती. त्यावरून ‘एसीबी’ने सापळा रचला. पिंप्री धनगर  शिवारातील प्रल्हाद चव्हाण यांच्या शेतातील झोपडीसमोर रात्री 10 वाजता दोन्ही लाचखोरांना मटणावर ताव मारताना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन इम्पेरिअल ब्लू व्हिस्कीच्या बाटल्या व मांसाहारी जेवणाचे पदार्थ जप्त करण्यात आले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडाणाचे पोलीस उपअधीक्षक संजय चौधरी, पोलीस निरीक्षक सचिन इंगळे, पो.ना. विलास साखरे, प्रवीण बैरागी, मोहम्मद रिजवान, पोलीस शिपाई विनोद लोखंडे, अझरुद्दीन काझी, चालक पोलीस कॉन्स्टेबल नितीन शेटे, शेख अर्षद यांनी पार पाडली.

लाचखोरांना असे अडकवा जाळ्यात…

कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने किंवा त्यांच्या वतीने खासगी व्यक्तीने  कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलडाणा यांनी केले आहे.

  • संपर्क क्रमांक ः 8888768218
  • टोल फ्री क्रमांक ः 1064