लाचखोर तलाठ्याला रंगेहात पकडले! सातबाऱ्यावर विहिरीची नोंद करण्यासाठी मागत होता तीनशे रुपये; बिबी येथील घटना

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः शेतातील विहिरीची नोंद सातबाऱ्यावर करण्यासाठी तीनशे रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या तलाठ्याला आज, 22 फेब्रुवारीला दुपारी 2 च्या सुमारास बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. बिबी (ता. लोणार) येथे ही कारवाई करण्यात आली. नीलेश शरद जाधव (35, रा. संभाजीनगर चिखली) असे या लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. तो हिवराखंड (ता. …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः शेतातील विहिरीची नोंद सातबाऱ्यावर करण्यासाठी तीनशे रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या तलाठ्याला आज, 22 फेब्रुवारीला दुपारी 2 च्या सुमारास बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. बिबी (ता. लोणार) येथे ही कारवाई करण्यात आली. नीलेश शरद जाधव (35, रा. संभाजीनगर चिखली) असे या लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. तो हिवराखंड (ता. लोणार) येथे तलाठी आहे.

पिंप्री खंदारे (ता. लोणार) येथील 28 वर्षीय महिलेच्या शेतातील विहिरीची नोंद सातबाऱ्यावर करण्यासाठी तलाठ्याने पाचशे रुपयांची लाच मागितली होती. ही माहिती तक्रारदार महिलेने आज सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलडाणा यांना दिली. लगेच पथक बिबीकडे रवाना झाले. बिबी येथील बस स्टँड परिसरातील ताज फोटो स्टुडिओसमोर रस्त्यावर तलाठ्याने तडजोडीअंती तीनशे रुपयांची लाच स्वीकारली. अगोदरच सापळा रचलेल्या एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तलाठ्याला तीनशे रुपये घेताना रंगेहात पकडले. ही कारवाई विशाल गायकवाड (पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्र), अरुण सावंत (अप्पर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्र) यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलडाणाचे पोलीस उपअधीक्षक संजय चौधरी, पोलीस निरिक्षक श्रीकांत निचळ, पो.ना. श्री. साखरे, पो.ना. श्री. बैरागी, पोलीस शिपाई विनोद लोखंडे,महिला पोलीस शिपाई स्वाती वाणी, चालक पोलीस शिपाई श्री. रगड यांनी पार पाडली.

कुणी लाच मागत असल्यास ताबडतोब कळवा
तुम्हालाही कुणी शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने कुणी खासगी व्‍यक्‍ती काम करून देण्यासाठी लाच मागत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ,बुलडाणा यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क क्रमांक – 8888768218 व 9923406509.