लॉकडाऊनमुळे रस्‍ते सामसूम… जिल्ह्याच्‍या शहरी भागांत नागरिक घरातच!

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्याबरोबरच शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन घोषित केला आहे. आज, 10 एप्रिलला या लॉकडाऊनचा मोठा परिणाम दिसून आला. रस्ते सामसूम आणि नागरिक घरात असल्याचे चित्र दिसून आले. अगदीच बोटावर मोजण्याइतकी वाहने रस्त्यावर सकाळच्या सुमारास येजा करत होती. काहींना …
 

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्याबरोबरच शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन घोषित केला आहे. आज, 10 एप्रिलला या लॉकडाऊनचा मोठा परिणाम दिसून आला. रस्‍ते सामसूम आणि नागरिक घरात असल्याचे चित्र दिसून आले. अगदीच बोटावर मोजण्याइतकी वाहने रस्‍त्‍यावर सकाळच्‍या सुमारास येजा करत होती. काहींना पोलिसांचा प्रसाद मिळाल्‍याने दुपारनंतर अगदीच शुकशुकाट पहायला मिळाला.

लॉकडाऊनच्‍या अंमलबजावणीसाठी पोलीस उतरल्याचे दिसून आले. चौकांत आणि मुख्य रस्‍त्‍यांवर पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली. बुलडाणा, खामगाव या मोठ्या शहरांबरोबरच मलकापूर, चिखली, शेगाव, मेहकर, नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर, मोताळा, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार या शहरवासियांनी लॉकडाऊन पाळल्याचे दिसून आले. सोमवारी सकाळपर्यंत हा कडक लॉकडाऊन असणार आहे. त्‍यामुळे विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

खामगाव शहरात दुपारी असा शुकशुकाट दिसून आला.

ग्रामीण भाग बेपर्वाच…

शहरी भागात सक्‍तीने नियम पाळून घेत जात असले तरी ग्रामीण भागात कोरोनाला अजूनही गांभीर्याने घेतले जात नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात लॉकडाऊन पाळणे तर दूरच पण सुरक्षित अंतर, मास्‍क या गोष्टीही दूर्लक्षित केल्या जात आहेत. आज व उद्या लॉकडाऊन आहे, हे माहीत असूनही अनेकांनी दुकाने उघडल्‍याचे ग्रामीण भागात दिसून आले. विशेष म्‍हणजे सध्या ग्रामीण भागातच कोरोना हातपाय पसरत आहे. तरीही ग्रामीण नागरिकांनी खबरदारी घेण्याऐवजी अधिकाधिक संकट ओढून घेत आहेत.