लोणारमधील अड्ड्यावर पोलीस कर्मचारीही खेळत होता जुगार!; निलंबनाची शक्‍यता

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लोणारमध्ये जुगाऱ्यांच्या मेळ्यावर 24 मे रोजी बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) छापा मारून तब्बल 32 बडे मासे गळाला अडकवले होते. यात अनेक राजकीय पक्षांशी संबंधित व्यक्ती असल्याने जिल्हाभर या कारवाईची चर्चा झाली. विशेष म्हणजे जे जुगारी पकडले त्यात एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश असल्याची धक्कादायक माहिती बुलडाणा लाइव्हच्या हाती आली आहे. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः लोणारमध्ये जुगाऱ्यांच्‍या मेळ्यावर 24 मे रोजी बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेने (एलसीबी) छापा मारून तब्‍बल 32 बडे मासे गळाला अडकवले होते. यात अनेक राजकीय पक्षांशी संबंधित व्‍यक्‍ती असल्याने जिल्हाभर या कारवाईची चर्चा झाली. विशेष म्‍हणजे जे जुगारी पकडले त्‍यात एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश असल्याची धक्‍कादायक माहिती बुलडाणा लाइव्‍हच्‍या हाती आली आहे. हा पोलीस कर्मचारी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कार्यरत असून, पोलीस अधीक्षकांनी त्‍याचा कसुरी अहवाल मागितला असून, लवकरच त्‍याचे निलंबन होण्याची शक्‍यता असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस सूत्रांनी वर्तविली.

जुगार अड्डा उघडलेल्या इमारतीच्‍या हाकेच्‍या अंतरावर लोणार पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निवासस्थान असल्याने लोणार पोलिसांच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या कारवाईत रविराज केशव चव्हाण (34, रा. खडकेश्वरनगर, लोणार) या पोलीस कर्मचाऱ्यालाही ताब्‍यात घेण्यात आले होते. तो देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. तो जिल्हा पोलिसांच्या क्रिकेट संघाचा खेळाडू होता. जिल्हाभरात विविध ठिकाणी होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेतही त्‍याने ओळख निर्माण केली होती. मात्र आता चक्क जुगार खेळतानाच तो पकडला गेल्याने अनेकांना धक्का बसला.

कारवाईतील अनेक आरोपी राजकीय पक्षाशी संबंधित, त्‍यातल्या पोलीस कर्मचारी त्‍यात सहभागी यामुळे प्रकरण दाबण्यासाठी प्रयत्‍न झाले. मात्र कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया आणि स्‍थानिक गुन्‍हे शाखा प्रमुख बळीराम गीते यांनी कोणाचीही भीड न ठेवता कायदा सर्वांना समान असल्याचे दाखवून दिले. गेल्या काही दिवसांत जुगार अड्डे, अवैध दारू, गुटखा यांवरील कारवाया वाढल्या असून, त्‍यामुळे अवैध धंदे करणारे हादरून गेले आहेत. दुसरीकडे सामान्य नागरिक मात्र सुखावत असल्याचे दिसून येत आहे. कित्‍येक वर्षांनंतर श्री. चावरिया यांच्‍या निमित्ताने असा कर्तव्यदक्ष अधिकारी जिल्ह्याला लाभल्याची चर्चा होत आहे.