लोणारमध्ये आढळला दुर्मिळ गिधाड!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खाऱ्या पाण्याचे जगप्रसिद्ध सरोवर असलेल्या लोणार शहर परिसरात अतिशय दुर्मिळ असणारा गिधाड पक्षी आढळला आहे. त्यामुळे पक्षीमित्रामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मी लोणारकर टीमचे सदस्य व लोणार नगरपरीषदेत कार्यरत असणारे पक्षी प्रेमी मोनु इरतकर हे नगर परिषदेची कचरा गाडी घेऊन आडवा माळ परिसरात गेले होते. त्यावेळी त्यांना हा दुर्मिळ …
 
लोणारमध्ये आढळला दुर्मिळ गिधाड!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खाऱ्या पाण्याचे जगप्रसिद्ध सरोवर असलेल्या लोणार शहर परिसरात अतिशय दुर्मिळ असणारा गिधाड पक्षी आढळला आहे. त्यामुळे पक्षीमित्रामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मी लोणारकर टीमचे सदस्य व लोणार नगरपरीषदेत कार्यरत असणारे पक्षी प्रेमी मोनु इरतकर हे नगर परिषदेची कचरा गाडी घेऊन आडवा माळ परिसरात गेले होते. त्यावेळी त्यांना हा दुर्मिळ प्रजातीचा पक्षी आढळला. त्यांनी पक्षीमित्र व मी लोणारकर टीमचे संस्थापक सदस्य सचिन कापुरे व विलास जाधव यांना ही माहिती दिली. कापुरे व जाधव लगेच कॅमेरा घेऊन तिथे गेले असता त्यांनी पक्षाचे फोटो व व्हिडीओ कॅमेऱ्यात टिपले आहेत. सध्या गिधाड हा पक्षी संकटग्रस्त प्रजातींच्या यादीमध्ये ११ व्या क्रमांकावर आहे.

लोणार परिसरात गिधाड आढळून येईल अशी खात्री मी लोणारकर टीमला होती.२०२० मध्ये २१ वे पक्षीमित्र संमेलन लोणार येथे घेण्यात आले होते. मागील ५ वर्षांपासून असा पक्षी आढळल्यास माहिती देण्याचे आवाहनही मी लोणारकर टीमकडून करण्यात आले होते. आज आढळलेला गिधाड जातीचा हा पक्षी मादी असून परिसरात नर जातीचा पक्षी सुद्धा असू शकतो,त्या दृष्टीने आमचा शोध सुरू असल्याचे सचिन कापुरे यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना सांगितले.

…म्हणून दुर्मिळ झाले गिधाड
गिधाड हा निसर्गाच्या जैवसाखळीतला महत्वाचा घटक पक्षी आहे. १९९० पर्यंत भारतात शेकडोंच्या संख्येने गिधड आढळत होते. मेलेली जनावरे गिधाडांचे प्रमुख खाद्य असते. मात्र १९९० नंतर जनावरांच्या औषधोपचारासाठी डायक्लोफिनॅक हे औषध वापरण्यात येऊ लागले. ती जनावरे गिधाड पक्षाच्या खाण्यात येऊ लागल्याने या पक्षांचाही मृत्यू होऊ लागला.२००६ मध्ये केंद्र सरकारने या औषधाच्या वापरावर बंदी आणली. मात्र तोपर्यंत भारतातील ९० टक्क्यांपेक्षा अधिक गिधाडं मृत्युमुखी पडली होती.