लोणारमध्ये जुगार खेळताना पकडलेला पोलीस कर्मचारी अखेर निलंबित

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः लोणारमध्ये जुगार खेळताना पकडण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले आहे. शहराच्या मध्यवस्तीतील इमारतीत जिल्ह्यासह परजिल्ह्यातून आलेल्या जुगाऱ्यांचा मेळा भरला होता. या मेळ्यावर 24 मे रोजी बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारून 32 बड्या जुगाऱ्यांना रंगेहात पकडले होते, तर एक फरारी आहे. यात एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश होता. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः लोणारमध्ये जुगार खेळताना पकडण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले आहे. शहराच्‍या मध्यवस्‍तीतील इमारतीत जिल्ह्यासह परजिल्ह्यातून आलेल्या जुगाऱ्यांचा मेळा भरला होता. या मेळ्यावर 24 मे रोजी बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेने छापा मारून 32 बड्या जुगाऱ्यांना रंगेहात पकडले होते, तर एक फरारी आहे. यात एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश होता. देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला रविराज केशव चव्हाण (34) हा लोणारच्या त्या जुगार अड्ड्यावर जुगार खेळताना आढळला होता.

जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांना जुगार अड्ड्याची कुणकुण लागताच त्यांनी एलसीबीच्या विश्वासू अधिकाऱ्यांचे पथक कारवाईसाठी पाठविले होते. या कारवाईत तब्बल 28 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. आरोपींमध्ये राजकीय क्षेत्राशी संबंधित लोकांसह एक पोलीस कर्मचारीही आढळल्याने कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. एसपींनी सुद्धा कठोर भूमिका घेत या पोलीस कर्मचाऱ्याचे तडकाफडकी निलंबन केले आहे. कर्तव्यात हलगर्जी पणा करणाऱ्या कुणाचीच गय केली जाणार नाही, असा संदेशच जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या या कारवाईने दिला आहे.