वडिलांना म्‍हणाली, आताच येऊन मला वाचवा… वडील दुसऱ्या दिवशी गेले तर थेट मृतदेहच नजरेस पडला..!

खामगाव ( भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना तराेडा नाथ (ता. खामगाव) येथे 19 फेब्रुवारीला सकाळी समोर आली. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. खामगाव तालुक्यातील वझर येथील सुरेश धरमू पडवाळ (45) याने पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, माझी मुलगी …
 

खामगाव ( भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सासरच्‍या छळाला कंटाळून विवाहितेने आत्‍महत्‍या केल्याची घटना तराेडा नाथ (ता. खामगाव) येथे 19 फेब्रुवारीला सकाळी समोर आली. या प्रकरणी विवाहितेच्‍या तक्रारीवरून पोलिसांनी सासरच्‍या मंडळीविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

खामगाव तालुक्यातील वझर येथील सुरेश धरमू पडवाळ (45) याने पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, माझी मुलगी जयश्रीचा विवाह 26 एप्रिल 2019 रोजी अनिल देवीसिंग धोती (रा. तरोडा नाथ) याच्यासोबत झाला होता. लग्‍नानंतर काही दिवसांनी माझ्या मुलीला छोट्याछोट्या कारणांनी मारहाण करून सासरची मंडळी शारीरिक व मानसिक त्रास देत होती. माहेरून 50 हजार रुपये आणण्यासाठी तिचा छळ केला जात होता. 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.30 च्या सुमारास जयश्रीचा मला फोन आला. तिने मला सांगितले की माझे पती, सासू शिवीगाळ करून मारहाण करत आहेत. तुम्ही आताच या. त्‍यावर मी तिला म्‍हटले की उद्या येतो. तू काळजी करू नको. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता माझी पत्नी व काही लोकांसह तरोडा नाथ येथे गेलो असता माझी मुलगी जयश्रीचे शव विहिरीच्या पाण्यात तरंगताना दिसून आले. शारीरिक व मानसिक छळामुळे माझ्या मुलीने आत्महत्या केली असल्याचा आरोपही पडवाळ यांनी तक्रारीत केला आहे. यावरून अनिल देविसिंग धोती, कलाबाई देवीसिंग धोती, उखराम देवीसिंग धोती (सर्व रा. तरोडा नाथ) यांच्‍याविरुद्ध पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.