वाकूड सशस्‍त्र हाणामारीतील कोमात गेलेल्या गजानन लाहुडकर यांचा मृत्‍यू!; या हल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादीचा हा नेता आहे गजाआड!!; खुनाचा गुन्हा वाढवला

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वाकूड (ता. खामगाव) येथे ८ एप्रिलला झालेल्या सशस्त्र हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या गजानन वासुदेव लाहुडकर (४९) यांचा काल, २२ सप्टेंबरला रात्री पावणेबाराच्या सुमारास मृत्यू झाला. तलवारीचे गंभीर घाव बसल्याने ते घटनेच्या दिवसापासून कोमात होते. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी तालुकाध्यक्ष आणि मुख्य संशयित भरत विश्वासराव लाहुडकार सध्या तुरुंगात आहे. तो …
 
वाकूड सशस्‍त्र हाणामारीतील कोमात गेलेल्या गजानन लाहुडकर यांचा मृत्‍यू!; या हल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादीचा हा नेता आहे गजाआड!!; खुनाचा गुन्हा वाढवला

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वाकूड (ता. खामगाव) येथे ८ एप्रिलला झालेल्या सशस्‍त्र हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या गजानन वासुदेव लाहुडकर (४९) यांचा काल, २२ सप्‍टेंबरला रात्री पावणेबाराच्या सुमारास मृत्‍यू झाला. तलवारीचे गंभीर घाव बसल्याने ते घटनेच्या दिवसापासून कोमात होते. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी तालुकाध्यक्ष आणि मुख्य संशयित भरत विश्वासराव लाहुडकार सध्या तुरुंगात आहे. तो गेल्या महिन्यात २९ ऑगस्‍टला पोलिसांना शरण आला होता. भरतपूर्वी पिंपळगाव राजा पोलिसांनी या प्रकरणात चौघांना अटक केली होती. ते सध्या जामिनावर आहेत.

काय आहे घटना…
८ एप्रिलला वाकूड (ता. खामगाव) येथे भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी मोजणीसाठी उपस्थित होते. त्यावेळी सरकारी रस्त्याला सिमेंट पोल व तारकंपाउंड करून रस्ता अडवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष भरत लाहुडकर याने माजी सरपंच सोपान लाहुडकर यांच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला केला होता. यात तलवार, कुऱ्हाड, लोखंडी रॉडचा वापर करण्यात आला. हल्ल्यात सोपान लाहुडकर यांच्या परिवारातील सहा जण गंभीर जखमी झाले होते. यातील तिघांना अकोला तर तिघांना खामगाव येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. जखमींपैकी ५ जण बरे झाले हाेते. मात्र गजानन लाहुडकर कोमात होते. अकोल्यातील विदर्भ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र मृत्‍यूशी सुरू असलेली झुंज संपली.

खुनाचा गुन्‍हा दाखल
हल्ल्यातील गंभीर जखमीचा मृत्‍यू झाल्याने या प्रकरणात आता खुनाच्या गुन्हा वाढविण्यात आला आहे. त्‍यामुळे मुख्य संशयित भरत विश्वासराव लाहुडकर याच्‍या अडचणीत वाढल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष असल्याने आपले कुणी काहीच वाकडे करू शकत नाही, अशा आविर्भावात राहणाऱ्या लाहुडकर याच्‍या विरोधात अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्‍हे यापूर्वीच दाखल आहेत. घटनेच्या दिवसापासून तो फरारी दाखवला जात असल्याने आणि पोलीस अटक करत नसल्याने नाराजी व्‍यक्‍त होत होती. मात्र नवे ठाणेदार सतीश आढे पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात रूजू होताच त्‍यांनी दबावाला बळी न पडता भरत लाहुडकरची शोधमोहीम हाती घेतली. त्‍यामुळे धाबे दणाणलेल्या लाहुडकर याने कोणत्याही परिस्‍थिती अटक होणार हे पाहून पोलीस ठाणे गाठून आत्‍मसमर्पण केले होते. या घटनेमुळे पक्षाची बदनामी होत असल्याने पक्षाकडून त्‍याचाही तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा यापूर्वी घेण्यात आला आहे.