वाढत्या कोरोना रुग्णांमुळे बुलडाण्याचे पालक चिंताग्रस्त, अमरावतीमधील शाळा बंदच्या वृत्ताने भयभीत

बुुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गत वर्षात भंडावून सोडणार्या कोरोनाच्या जाचातून जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलडाणा शहराची सुटका झाली, असा शहरवासीयांचा गोड गैरसमज असेल तर तो साफ चुकीचा आहे! जानेवारी महिन्यापाठोपाठ फेब्रुवारी मध्येही रुग्णांची संख्या लक्षणीय असल्याचे धक्कादायक चित्र आहे. यातच कोरोनाच्या प्रकोपामुळे अमरावतीमधील शाळा बंद करण्याच्या कारवाईने शहर परिसरातील हजारो पालक भयभीत …
 

बुुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गत वर्षात भंडावून सोडणार्‍या कोरोनाच्या जाचातून जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलडाणा शहराची सुटका झाली, असा शहरवासीयांचा गोड गैरसमज असेल तर तो साफ चुकीचा आहे! जानेवारी महिन्यापाठोपाठ फेब्रुवारी मध्येही रुग्णांची संख्या लक्षणीय असल्याचे धक्कादायक चित्र आहे. यातच कोरोनाच्या प्रकोपामुळे अमरावतीमधील शाळा बंद करण्याच्या कारवाईने शहर परिसरातील हजारो पालक भयभीत झाल्याचे दिसून येत आहेत.
जानेवारी महिन्यात पहिल्या 20 दिवसांत केवळ शहरातच तब्बल 189 कोविड रुग्ण आढळले होते. सरत्या वर्षात बुलडाण्यात रुग्ण कमी होत असल्याचे सुखद चित्र होते. मात्र नवीन वर्षातही कोरोनाने शहराचा पिच्छा सोडला नसल्याचे गंभीर चित्र आहे. मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर याला बहुतेक नागरिकांनी कधीचीच सोडचिठ्ठी दिली आहे. या व अन्य कारणामुळे फेब्रुवारी मध्येही रुग्ण वाढीचा वेग कायम आहे. केवळ बुलडाणा शहरच नव्हे तर तालुक्यातील विविध गावांत देखील रुग्ण आढळून आलेत. 1 ते 13 फेब्रुवारी दरम्यानच शहरातील रुग्णसंख्येने शतक पार करत 107 चा आकडा गाठलाय! या तुलनेत तालुक्यातील गावांत 39 रुग्ण आढळून आले. यामुळे शहर, तालुक्यातील पालक प्रामुख्याने 5 ते 9 वीच्या विद्यार्थ्यांचे पालक चिंताग्रस्त झाले आहेत. ग्रामीण भागातील पाल्य बुलडाण्यात शिक्षण घेतात. यातच अमरावतीमधील कार्यवाहीने बुलडाण्यातील पालकांची भीती आणखी वाढवली आहे. कोरोना प्रकोपमुळे वर्ग 5 ते 9 वीचे वर्ग येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश अमरावती जिल्हाधिकार्‍यांनी बजावले आहेत. यामुळे तसेच वाढत्या रुग्णामुळे बुलडाण्यातील पालक व विद्यार्थी भयभीत होणे स्वाभाविक ठरले आहे. दरम्यान यासंदर्भात विचारणा केली असता जिल्ह्यात सध्यातरी असा कोणता आदेश देण्यात आला नसल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.