वाढदिवसाच्या पार्टीत तलवार चालली; मोताळ्यातील थरार

दोन जण जखमी, परस्परविरोधी तक्रारीवरून आठ जणांविरुद्ध गुन्हा मोताळा (शाहीद कुरेशी : बुलडाणा लाईव्ह वृत्तसेवा) : वाढदिवसाच्या पार्टीत वाद झाल्याने तलवारीने हाणामारी होऊन दोन जण जखमी झाल्याची घटना 2 मार्चच्या सायंकाळी मोताळा येथे घडली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारीवरून काल, 3 मार्चला दोन्ही गटांतील आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली …
 

दोन जण जखमी, परस्परविरोधी तक्रारीवरून आठ जणांविरुद्ध गुन्हा

मोताळा (शाहीद कुरेशी : बुलडाणा लाईव्ह वृत्तसेवा) : वाढदिवसाच्या पार्टीत वाद झाल्याने तलवारीने हाणामारी होऊन दोन जण जखमी झाल्याची घटना 2 मार्चच्‍या सायंकाळी मोताळा येथे घडली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारीवरून काल, 3 मार्चला दोन्ही गटांतील आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, गुन्ह्यात वापरलेली तलवार जप्त केली आहे.

शेख आरिफ शेख सत्तार (२८, रा. मोताळा) यांनी बोराखेडी पोलिसांत तक्रार दिली की, त्यांचा मंगळवारी वाढदिवस होता. दरम्यान, सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास मलकापूर मार्गावरील दूध डेअरीच्या ग्राउंडवर वाढदिवस साजरा करत असताना गावातीलच अबरार कुरेशी, सादिक कुरेशी, एजाज कुरेशी, सज्जू कुरेशी यांनी तुझा वाढदिवस आहे, आम्हाला दारू पाज, असे म्हणत वाद घातला व शेख आरिफ यांना लोटपाट करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच आरोपी अबरार कुरेशी याने शेख आरिफ यांच्या कपाळावर तलवार मारून जखमी केले. पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्‍हा दाखल करत सादिक कुरेशी, एजाज कुरेशी, सज्जू कुरेशी या तिघांना अटक केली आहे. दुसऱ्या गटातील शेख अबरार शेख गफ्फार (३३, रा. मोताळा) यांनी तक्रार दिली की, ते सहकाऱ्यांसह मलकापूर रस्त्याकडून मोताळा फाट्याकडे पायी येत असताना बुलडाणा अर्बनच्या बाजूला शेख आरीफ शेख सत्तार, शेख शरीफ शेख सत्तार, शेख आसिफ शेख सत्तार अधिक एक जण (चौघे रा. मोताळा) हे वाढदिवस साजरा करताना दिसले. शेख आरीफ हातात तलवार घेऊन केक कापत होता. यावेळी शेख अबरार यांनी सध्या कोरोना सुरू असल्याने वाढदिवस घरी जाऊन साजरा करा, असे म्हटले असता चौघांनी त्यांना लोटपाट करून शिवीगाळ केली. शेख आरीफ याने शेख अबरार यांच्या उजव्या हातावर तलवार मारून जखमी केले. शेख शरीफ याने उजव्या पायावर चाकू मारला. यावेळी शेख अबरार यांच्या सहकाऱ्यांनी आवरा आवर केली. दरम्यान, आरोपींनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनात पोहेकाँ मिलिंद सोनुने, पोकाँ संतोष सुरडकर करीत आहेत.