वाहऽऽ… बिकट परिस्थितीत शिकून झाला तलाठी.. समाजऋण फेडण्यासाठी 10 गावांमध्ये सुरू करतोय अभ्यासिका!

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ध्येयवेडी माणसं समाजात बदल घडवत असतात. समाजासाठी जगत असतात. लग्नावर उथळ खर्च करण्याची फॅशन असताना हातणी येथील गजानन जाधव यांनी स्वतःचा विवाह विधायक कार्य करून करायचं ठरवलं आहे. विवाहानिमित चिखली तालुक्यातील 10 गावांमध्ये स्वखर्चातून अभ्यासिका उभारण्याचे काम त्यांनी हातात घेतले आहे. 28 फेब्रुवारीला गजानन जाधव यांचा विवाह …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ध्येयवेडी माणसं समाजात बदल घडवत असतात. समाजासाठी जगत असतात. लग्नावर उथळ खर्च करण्याची फॅशन असताना हातणी येथील गजानन जाधव यांनी स्वतःचा विवाह विधायक कार्य करून करायचं ठरवलं आहे. विवाहानिमित चिखली तालुक्यातील 10 गावांमध्ये स्वखर्चातून अभ्यासिका उभारण्याचे काम त्यांनी हातात घेतले आहे. 28 फेब्रुवारीला गजानन जाधव यांचा विवाह कोलारा येथे होणार आहे.


एप्रिल 2016 मध्ये तलाठी पदावर रूजू झालेले गजानन जाधव सध्या औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे कार्यरत आहेत. सामान्य आर्थिक परिस्थिती असणार्‍या गजानन यांचे पितृछत्र ते लहान असताना हरवले. गजानन, तीन बहिणी आणि आई असा हा परिवार. त्यांच्या आईने शेती आणि मजुरी करून सर्वांना शिक्षण दिले. तिन्ही मुलींचे लग्नही केले. गजानन यांनी ही शिक्षण घेत असताना चिखली येथील एका इलेक्ट्रॉनिकच्या दुकानावर काम केले. डीएडनंतर बीएचे शिक्षण आणि त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी केली. गजानन यांच्या संघर्षाला 2016 साली यश आले. एप्रिल 2016 ला ते तलाठी झाले.

2016 पासून तर आतापर्यंत महिन्याच्या पगारातील 50 टक्के खर्च ते गरीब मुलांच्या शिक्षणासाठी करतात. मार्च 2018 मध्ये त्यांच्या बहिणीच्या लग्नानिमित्त 1 लाख रुपयांची पुस्तके त्यांनी कोलारा येथील अभ्यासिकेला आंदण स्वरूपात दिली. यासोबतच गोद्री आणि भोकर येथील अभ्यासिकेला सुद्धा पुस्तके दिली. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मला ज्या समस्येला तोंड द्यावे लागले, त्या समस्या ग्रामीण भागातील गरीब, शेतकरी कामगारांच्या येऊ नये यासाठी आता गाव तिथे अभ्यासिका हा उपक्रम हाती घेतल्याचे ते सांगतात. खेडेगावातील प्रत्येक मुलाला अभ्यास करण्यासाठी योग्य ती सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी विवाह प्रसंगी होणारा अनाठायी खर्च टाळून दहा गावांमध्ये अभ्यासिका तयार करण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे. त्यापैकी दिवठाणा, बोरगाव वसू, सवना, सोनेवाडी आणि शेलुद येथील अभ्यासिकांचे कामही पूर्ण झाले आहे.