विकासकामांसाठी नगरसेवकाचे आत्‍मदहन नाट्य अखेर लेखी आश्वासनाने संपुष्टात!; बुलडाण्यातील प्रकार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातील प्रभाग क्रमांक 11 मधील लांडे लेआऊट, चैतन्यवाडीतील रस्त्यांची कामे नामंजूर केल्यामुळे संतप्त नगरसेवक आकाश दळवी यांनी डिझेलची कॅन घेऊन नगरपालिकेच्या बांधकाम कार्यालयात येत स्वतःला कोंडून घेतले व आत्मदहनाचा पवित्रा घेतला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. काल, 5 एप्रिलला दुपारी बराचवेळ चाललेले हे नाट्य आमदार संजय गायकवाड यांच्या मध्यस्थीमुळे संपुष्टात …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातील प्रभाग क्रमांक 11 मधील लांडे लेआऊट, चैतन्यवाडीतील रस्‍त्‍यांची कामे नामंजूर केल्यामुळे संतप्‍त नगरसेवक आकाश दळवी यांनी डिझेलची कॅन घेऊन नगरपालिकेच्‍या बांधकाम कार्यालयात येत स्‍वतःला कोंडून घेतले व आत्‍मदहनाचा पवित्रा घेतला. त्‍यामुळे एकच खळबळ उडाली. काल, 5 एप्रिलला दुपारी बराचवेळ चाललेले हे नाट्य आमदार संजय गायकवाड यांच्‍या मध्यस्‍थीमुळे संपुष्टात आले. लेखी पत्र दिल्याने दळवी यांनी आंदोलन मागे घेतले.

विकासकामे पूर्ण करण्यासाठी आर्थिक देवाणघेवाण केली नसल्याने कामे रद्द केल्याचा आरोप नगरसेवक दळवी यांनी यावेळी केला. निधी उपलब्‍ध असूनही उपलब्‍ध नसल्याचे प्रशासकीय पत्र देण्यात आले, असे त्‍यांचे म्‍हणणे होते. नगरपरिषदेच्‍या कारंजा चौकातील बांधकाम विभाग कार्यालयात सुरू असलेल्या या गोंधळात आमदार संजय गायकवाड यांनी स्‍वतः येऊन नगराध्यक्षपती मोहम्‍मद सज्जाद यांनाही बोलावून घेतले. आमदार संजय गायकवाड यांनी नामंजूर झालेले काम पुन्‍हा प्रोसेडिंग करत टेंडर मंजूर करून घेण्याचे निर्देश यावेळी नगरपालिकेच्‍या कर्मचाऱ्यांना दिले. पोलिसांनीही आंदोलनस्‍थळी धाव घेतली होती. नगरसेवक दळवी यांनी लेखी घेत आंदोलन मागे घेतले.