विजयराज शिंदे, योगेंद्र गोडे, कुणाल गायकवाड यांच्‍यासह कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्‍हे दाखल; जयस्‍तंभ चौकातील राडा

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः काल जयस्तंभ चौकात झालेल्या राड्या प्रकरणी माजी आमदार विजयराज शिंदे, भाजप नेते योगेंद्र गोडे, आमदारपूत्र कुणाल गायकवाड यांच्यासह भाजपा व शिवसेनेच्या सुमारे दोन डझन कार्यकर्त्यांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या तसेच सरकार पक्षातर्फेही फिर्याद देण्यात आली होती. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः काल जयस्तंभ चौकात झालेल्या राड्या प्रकरणी माजी आमदार विजयराज शिंदे, भाजप नेते योगेंद्र गोडे, आमदारपूत्र कुणाल गायकवाड यांच्‍यासह भाजपा व शिवसेनेच्या सुमारे दोन डझन कार्यकर्त्यांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या तसेच सरकार पक्षातर्फेही फिर्याद देण्यात आली होती.

कोरोना संसर्गामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. राज्यात कलम 144 लागू आहे. अशा परिस्थितीतही आमदार संजय गायकवाड यांचा पुतळा जाळण्यासाठी विजयराज शिंदे यांनी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमवले. वडिलांचा पुतळा जाळला जात असल्याचे सहन न झाल्‍याने आमदारपूत्र कुणाल गायकवाड यांनी धावून येत त्‍यांना रोखले. यातून वाद वाढून शिवसैनिकांनी शिंदे यांना मारहाण केली होती. दोन्ही गटांतही  मारामारी होऊन अनेकांचे मोबाइल फोडण्यात आले होते. याप्रकरणी पोहेकाँ रमेश पवार यांच्या तक्रारीवरून माजी आमदार विजयराज शिंदे, योगेंद्र गोडे, विठ्ठलराव येवले, प्रभाकर वारे, पद्माकर बाहेकर, दत्ता पाटील , गौरव राठोड, नितीन बेंडवाल, ॲड. दशरथसिंह राजपूत, मंदार बाहेकर, सिद्धार्थ शर्मा, डॉ. मिहीर जैन व इतर 10 ते 12 कार्यकर्त्यांविरद्ध आपत्ती व्यवस्थापन व साथरोग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आमदार कुटे यांचा पुतळा जाळला; शिवसेनेच्या 15 कार्यकर्त्यांवर गुन्हे

आमदार गायकवाड यांच्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध करताना भाजपने आमदार गायकवाडांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्‍न केला. जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे यांनीही गायकवाड यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याने जयस्तंभ चौकातच शिवसैनिकांनी एकत्र येत आमदार कुटेंचा पुतळा जाळला. याप्रकरणी पोलीस उपनिरिक्षक अमित जाधव यांच्या तक्रारीवरून शिवसेनेच्या 15 कार्यकर्त्यांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. यात मुन्‍ना बेंडवाल,ओमसिंह राजपूत, लखन गाडेकर, दीपक  जायभाये, संदीप गायकवाड, विजय गायकवाड, सचिन गायकवाड, दीपक सोनुने, नितीन राजपूत, संदीप पुराणिक, उमेश कापुरे, कैलास महाजन, बाळू धुड, पप्पू गुजर, विजय धुरणे यांचा समावेश आहे.

भाजपाच्या विजयराज शिंदेंसह 6 कार्यकर्त्यांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा

जयस्तंभ चौकात आमदार गायकवाड यांचा पुतळा जाळण्यासाठी जमलेल्या विजयराज शिंदे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना शिवसैनिकांनी रोखले असता विजयराज शिंदे व भाजपच्या कार्यकर्त्यांनी जातीवाचक शिविगाळ केल्याची तक्रार शिवसेनेचे श्रीकृष्ण आनंदा शिंदे यांनी केली. याप्रकरणी विजयराज शिंदे, सोनू बाहेकर, प्रभाकर वारे, अशोक शर्मा, यतीन पाठक, मंदार बाहेकर यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तपास उपविभागीय पोलीस अधिकारी  रमेश बरकते करीत आहेत.

मारहाण प्रकरणी विजयराज शिंदेंची तक्रार

आमदार संजय गायकवाड यांच्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध करण्यासाठी जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांना शिवसैनिकांनी अडवले. शिविगाळ करून खून करण्याचा उद्देशाने मारहाण केल्याची तक्रार विजयराज शिंदेंनी केली. तक्रारीवरून 6 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यात कुणाल संजय गायकवाड, सोनू जाधव, बाळू धुड, श्रीकांत आसाबे, बंडू आसाबे, संदीप पुराणिक यांचा समावेश आहे.

जयस्‍तंभ चौकाला छावणीचे स्‍वरुप

जयस्तंभ चौकात झालेल्या राड्यांतर आज जयस्तंभ चौकाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कालच्‍या राड्याप्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रदीप साळुंखे यांनी तपासाला गती दिली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांना अटक होण्याची शक्‍यता पोलीस सूत्रांनी वर्तविली आहे.