विलास कृषी केंद्राची लूट चव्‍हाट्यावर; जादा दराने विकत होता शेतकऱ्यांना बियाणे!; कृषी विभागाची किनगाव राजात कारवाई

किनगाव राजा (नीलेश डिघोळे) ः खत, बियाणे जादा दराने विकून शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी जिल्हाभरात वाढल्या आहेत. सिंदखेड राजा तालुका कृषी अधिकाऱ्यांनी भरारी पथकाच्या माध्यमातून अशा लुटारू कृषी केंद्र चालकांवर थेट कारवाई सुरू केली आहे. यामुळे एकीकडे शेतकऱ्यांना दिलासा मिळत असताना दुसरीकडे अशा लुटारूंनाही वचक बसत आहे. काल, २० जूनला दुपारी १२ च्या …
 

किनगाव राजा (नीलेश डिघोळे) ः खत, बियाणे जादा दराने विकून शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याच्‍या तक्रारी जिल्हाभरात वाढल्या आहेत. सिंदखेड राजा तालुका कृषी अधिकाऱ्यांनी भरारी पथकाच्‍या माध्यमातून अशा लुटारू कृषी केंद्र चालकांवर थेट कारवाई सुरू केली आहे. यामुळे एकीकडे शेतकऱ्यांना दिलासा मिळत असताना दुसरीकडे अशा लुटारूंनाही वचक बसत आहे. काल, २० जूनला दुपारी १२ च्‍या सुमारास किनगाव राजा (ता. सिंदखेड राजा) येथे अंकुर कंपनीच्‍या सोयाबीन वाणाची जादा दराने विक्री करणाऱ्या विलास कृषी केंद्रावर कारवाई केली. या केंद्राचा मालक त्‍याच्‍या गोडावूनसमोरच आयशर वाहन उभे करून शेतकऱ्यांना जादा दराने बियाणे विकत होता.

किनगाव राजा येथे सिंदखेड राजा ते मेहकर रोडवर विलास कृषी केंद्र आहे. या केंद्राच्‍या गोडावूनसमोरच आयशर वाहन (क्र. एमएच १२-एचडी ४११२) उभे करून शेतकऱ्यांना अंकुर कंपनीचे सोयाबीनचे वाण विक्री केले जात होते. विक्री केंद्राची पावती न देता कच्‍ची पावती देऊन ३३३० रुपयांऐवजी प्रतिबॅग ४३०० रुपयांनी विकली जात होती. किनगाव जट्टू येथील शेतकरी विठ्ठलदास दायमा यांच्‍या कच्च्‍या पावतीवर अंकुर सोयाबीन वाणाचे ३ बॅगचे १२९०० रुपये लिहिलेले आढळले. शुभम दायमा या ठिकाणाहून बियाणे घेत होते.

तालुका कृषी अधिकाऱ्यांच्‍या पथकाने पंचासमक्ष जादा दराने बियाणे विकणाऱ्यास विचारणा केली असता त्‍याने हे वाहन व वाहनातील बियाणे विलास कृषी केंद्राचे असल्याचे सांगितले. वाहनातील विक्री होणारे बियाणे विलास कृषी केंद्राचे मालक ज्ञानेश्वर किसन नागरे याने माझेच असल्याचे पंचांना सांगितले. पथकाने वाहनाची तपासणी केली असता वाणाच्‍या 18 बॅग आढळल्या. त्यानंतर भरारी पथकाने पंचनामा केला. भरारी पथकात पंचायत समिती कृषी अधिकारी के. एस. ठोंबरे, मंडळ कृषी अधिकारी जी. ए. सावंत, मंडळ कृषी अधिकारी जी. आर. बोरे, कृषी सहाय्यक एस. पी. घुगे, पोलीस कर्मचारी राजू दराडे उपस्थित होते.