बुलडाणा ः 100 आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल; जिल्हा उपनिबंधकांना अडवून मारहाण

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हा उपनिबंधक कार्यालयात दुसरबीड येथील जिजामाता सहकारी साखर कारखान्यातील कामगारांनी थकीत वेतनासाठी 15 फेब्रुवारीपासून आंदोलन सुरू केले आहे. रात्र कुडकुडत काढल्यानंतर काल, 16 फेब्रुवारीला दुपारी जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांना अडवून मारहाण झाल्याने पोलिसांनी 100 आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.सकाळी चव्हाण यांनी आंदोलकांनी भेट घेत चर्चेचा प्रयत्न केला. यावेळी दिलेल्या …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हा उपनिबंधक कार्यालयात दुसरबीड येथील जिजामाता सहकारी साखर कारखान्यातील कामगारांनी थकीत वेतनासाठी 15 फेब्रुवारीपासून आंदोलन सुरू केले आहे. रात्र कुडकुडत काढल्यानंतर काल, 16 फेब्रुवारीला दुपारी जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांना अडवून मारहाण झाल्याने पोलिसांनी 100 आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
सकाळी चव्हाण यांनी आंदोलकांनी भेट घेत चर्चेचा प्रयत्न केला. यावेळी दिलेल्या आश्‍वासनावर आंदोलकांचे समाधान झाले नाही. दुपारी ते बैठकीसाठी कार्यालयाबाहेर जात असताना काही आंदोलकांनी अडवले व शिविगाळ करत मारहाण केल्याची तक्रार चव्हाण यांनी शहर पोलीस ठाण्यात केली आहे. त्यावरून पोलिसांनी गैरकायद्याची मंडळी जमवून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी तसेच शिविगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी राजन चौधरी, उत्तम जाधव, विनायक देशमुख, दिलीप कटारे यांच्यासह 50 ते 100 जण (सर्व रा. दुसरबीड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास ठाणेदार प्रदीप साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय जयसिंग पाटील करत आहेत.
काय आहे प्रकरण…
जिजामाता साखर कारखाना गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडला आहे. कारखान्याच्या कामगारांचे वेतन थकले होते. कामगारांनी न्यायालयीन लढा दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने कारखान्यातील उपलब्ध साखरेचा माल विक्री करून कामगारांची थकीत देणी द्यावीत, असे आदेश दिले आहेत. 27 जानेवारीला कामगारांनी आंदोलन केले तेव्हा चव्हाण यांनी कामगारांच्या खात्यावर पैसे जमा होतील असे आश्‍वासन दिले होते. मात्र अद्याप पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे कामगारांनी पुन्हा परवापासून जिल्हा उपनिबंधक कार्यालयात ठिय्या मांडला.