शंभरावर रुग्‍ण कोरोना चाचणीविनाच परतले; अनेकांनी केला संताप, बुलडाण्यातील प्रकार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील कोरोना व्यवस्थेचे हालहवाल पाहण्यासाठी केंद्रीय पथक आले असताना, दुसरीकडे आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे शंभरावर रुग्णांना विनाचाचणीचेच परतावे लागल्याचा प्रकार आज, 8 एप्रिलला दुपारी बुलडाणा शहरातील जिजामाता अपंग विद्यालयात समोर आला आहे. दुपारी सव्वाला तपासणीसाठी आलेल्यांना कीट उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संतप्त रुग्णांनी जाब विचारला असता काही वेळात कीट उपलब्ध …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील कोरोना व्‍यवस्‍थेचे हालहवाल पाहण्यासाठी केंद्रीय पथक आले असताना, दुसरीकडे आरोग्‍य यंत्रणेच्‍या हलगर्जीपणामुळे शंभरावर रुग्‍णांना विनाचाचणीचेच परतावे लागल्याचा प्रकार आज, 8 एप्रिलला दुपारी बुलडाणा शहरातील जिजामाता अपंग विद्यालयात समोर आला आहे.

दुपारी सव्वाला तपासणीसाठी आलेल्यांना कीट उपलब्‍ध नसल्‍याचे सांगण्यात आले. त्‍यामुळे संतप्‍त रुग्‍णांनी जाब विचारला असता काही वेळात कीट उपलब्‍ध होतील असे सांगण्यात आले. मात्र दुपारी 4 पर्यंत कीट उपलब्‍ध झाल्‍या नव्‍हत्‍या, असे सौ. नंदाताई राजपूत यांनी बुलडाणा लाइव्‍हशी संपर्क करून सांगितले. दहीदहून कोरोना संशयित म्‍हणून त्‍या तपासणीसाठी आल्‍या होत्‍या. त्‍यांच्‍यासह अन्य राजकीय नेत्‍यानेही बुलडाणा लाइव्‍हला तपासणीविना परतावे लागल्याचे सांगितले. अनेक जण बाहेरगावाहून तपासणीसाठी आल्याने त्‍यांना नाहक त्रास सहन करावा लागला. एकीकडे कोरोना चाचण्या करून घ्या. पुरेशा कीट उपलब्‍ध असल्याचे प्रशासन सांगत असले तरी वास्‍तव चित्र काही वेगळेच असल्याचे या प्रकारामुळे समोर आले आहे. आज दोन सदस्‍यीय केंद्रीय पथक शहरात दाखल झाले. ते कोरोनाविषयक व्‍यवस्‍थेचा आढावा घेत आहेत. त्‍यांचे स्‍वागतच अशा हलगर्जीपणाने झाले हे विशेष.