“वीर जवान अमर रहे…’ शहीद कैलास पवार अनंतात विलिन! चिखलीत उसळला शोकसागर

चिखली (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वीर जवान कैलास भारत पवार यांच्यावर आज, ४ ऑगस्टला चिखलीतील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर शासकीय इतमामात व शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्याच्या खांद्यावर उतारवयात परिवाराची जबाबदारी सोपवायची त्या लेकाच्या पार्थिवालाच अग्नी देण्याची वेळ वडिलांवर आली. दुपारी १ वाजून ४६ मिनिटांनी वडील भारत पवार यांनी पार्थिवाला मुखाग्नी …
 

चिखली (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वीर जवान कैलास भारत पवार यांच्यावर आज, ४ ऑगस्‍टला चिखलीतील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर शासकीय इतमामात व शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्याच्या खांद्यावर उतारवयात परिवाराची जबाबदारी सोपवायची त्या लेकाच्या पार्थिवालाच अग्नी देण्याची वेळ वडिलांवर आली. दुपारी १ वाजून ४६ मिनिटांनी वडील भारत पवार यांनी पार्थिवाला मुखाग्‍नी दिला. यावेळी शहीद जवान कैलास पवार अमर रहे, भारत माता की जय… अशा गगनभेदी घोषणांनी वातावरण भावविभोर झाले होते.

सकाळी ११ ला कैलास यांचे पार्थिव गजानननगर येथील राहत्या घरी पोहोचले. त्यानंतर खंडाळा चौफुली, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्टँड मार्गाने अंत्ययात्रा साडेबाराला तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानात पोहोचली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी एकच गर्दी केली होती. कैलास यांचे पार्थिव ठेवलेल्या रथावर चहूबाजूंनी पुष्पवर्षाव होत होता. मैदानात आल्यानंतर प्रशासनातर्फे कैलास यांना मानवंदना देण्यात आली.

पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान, आमदार श्वेताताई महाले, आमदार संजय गायकवाड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आदींनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. लष्कराकडून कैलास यांच्या परिवाराला ध्वज प्रदान करण्यात आला. तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानात यापूर्वी एवढी गर्दी कधीच बघितली नसल्याची भावना अनेकांनी बुलडाणा लाइव्हकडे व्‍यक्‍त केली. यावेळी जिल्‍हा परिषद अध्यक्षा मनिषा पवार, चिखली पंचायत समिती सभापती सिंधूताई तायडे, ऋषी जाधव, माजी आमदार शशिकांत खेडेकर, हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

चिखलीच्या व्यापाऱ्यांची प्रतिष्ठाने बंद
जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी चिखलीच्या व्यापारी बांधवांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली. सकाळपासून रस्त्याच्या दुतर्फा वीर जवानाचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती..

…म्हणून पार्थिव पोहोचायला उशीर
पहाटे पाचला औरंगाबादहून पार्थिव सकाळी आठला चिखली येथील गजानननगरातील निवासस्‍थानी आणण्यात येणे अपेक्षित होते. मात्र देऊळगाव राजापासून प्रत्येक थांब्यावर जवानांच्या ताफ्यावर पुष्पवर्षाव करण्यात आला. देऊळगाव महीपासून चिखलीपर्यंत युवकांनी दुचाकी रॅली काढली. त्यामुळे पार्थिव निवासस्थानी पोहोचायला ११ वाजले. निवासस्थानाहून क्रीडा संकुल मैदानापर्यंत अंत्ययात्रेत हजारो चिखलीकर सहभागी झाले होते. इमारती, घराची गच्ची, मिळेल त्या जागेवरून नागरिकांनी जवानाचे अंत्यदर्शन घेतले.