शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतून शेवटच्या घटकाचा विकास साधावा ः खासदार प्रतापराव जाधव; दिशा समितीची बैठक

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजना कार्यान्वित आहेत. तसेच बऱ्याच राज्य शासनाच्या योजनांमध्ये केंद्राचा हिस्सा आहे. अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी केंद्रीय योजनांच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकाचा विकास साधावा, अशी सूचना केंद्रीय ग्रामीण विकास समिती अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव यांनी आज, 1 जुलैला दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात दिशा (जिल्हा …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजना कार्यान्वित आहेत. तसेच बऱ्याच राज्य शासनाच्या योजनांमध्ये केंद्राचा हिस्सा आहे. अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी केंद्रीय योजनांच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकाचा विकास साधावा, अशी सूचना केंद्रीय ग्रामीण विकास समिती अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव यांनी आज, 1 जुलैला दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात दिशा (जिल्हा विकास समन्वयन व सनियंत्रण समिती) समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी आढावा घेताना खासदार श्री. जाधव बोलत होते. व्यासपीठावर जि.प अध्यक्ष मनिषा पवार, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, बुलडाणा कृउबास सभापती जालींधर बुधवत, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते उपस्थित होते. तसेच सभागृहात कृषि सभापती राजेंद्र पळसकर आदींसह लोकप्रतिनिधी, विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.

रस्ता निर्मिती करताना सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या सूचना करत खासदार म्हणाले, की रस्त्याच्या कामाचा दर्जा चांगला असला पाहिजे. दर्जाबाबत कुठलीही तडजोड चालणार नाही. चिखली– मेहकर रस्ता कामामध्ये लव्हाळा फाटा येथील उड्डाण पुलावर अपघात होण्याची शक्यता असणारे काम दुरुस्त करावे. त्यासाठी भूसंपादनाची आवश्यकता असल्यास करून घ्यावे. नागरिकांच्या गरजेनुसार व मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या मार्गावर बस थांबे बनवावे. तसेच काम सुरू असलेल्या कामे विहीत कालावधीत पूर्ण करून घ्यावी. रस्ता काम पुर्ण झाल्यानंतर त्याची पाहणी करावी, कुठे दुरुस्ती करायची असल्यास ती करून घ्यावी, त्यानंतरच कंत्राटदाराला 100 टक्के काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र द्यावे. ते पुढे म्हणाले, की जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली कामे दर्जेदार करावी. प्रादेशिक पाणीपुरवठा योजना करताना सर्व समाविष्ट गावांना पाणी मिळेल, याची खात्री करावी. योजनेचे पाणी वितरणाच्या कालमर्यादेचे पालन करावे, योजनेमधून निश्चित केलेल्या कालमर्यादेपर्यंत पाणी पुरवठा करण्यात यावा. खारपाणपट्टयातील उर्वरित गावांसाठी एकत्र प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तयार करावी. निमखेडी 9 गावे, तिव्हाण 10 गावे व चिंचोली 30 गावे पाणी पुरवठा योजना एकत्र करावी. त्यामुळे वेळ व खर्चामध्ये बचत होईल. खारपाण पट्टयातील खारे पाणी असलेले एकही गाव योजनेतून सोडू नये. राष्ट्रीय आरोग्य मिशन मध्ये सुरू असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांची कामे दर्जेदार करावी. या कामांच्या तक्रारी यायला नको. जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत शासनाच्या नवीन धोरणानुसार पाहिजे ते काम संकल्पनेची अंमलबजावणी करावी. यासठी गाव स्तरावर माहिती द्यावी. वृक्षलागवडीची मनरेगा अंतर्गत होणाऱ्यया कामांमध्ये बिहार पॅटर्नचा अचलंब करावा. तसेच या वृक्षांमध्ये फळझाडांचा समावेश करावा. कुशल कामांमध्ये गावांमध्ये मोठी कामे घेण्यात यावी. पीक विमा योजनेमध्ये पीक कापणी प्रयोगातून आलेल्या उत्पन्नानुसार जोखीम स्तर ठरवून विमा मंजूर करण्याच्या सूचना देत खासदार श्री. जाधव म्हणाले, पिक विम्याची रक्कम तातडीने शेतकऱ्यांना देण्यासाठी पाठपुरवा करावा. फळपीक विमा योजनेत पपई, सिताफळ या फळपिकांचा समावेश करावा. मसाला पिकांनाही विम्याचे संरक्षण देण्यात यावे. शेतातील शेडनेट, पॉली हाऊस यांना देखील विमा संरक्षण प्राप्त करून द्यावे. शेततळे जमिनीच्या प्रकार व परिस्थितीनुसार अधिक खेालीचे घेण्यासाठी परवानगी द्यावी. त्यामुळे कमी जागेत चांगली पाणी साठवण क्षमता असणारे शेततळे तयार होतील. पीक कर्ज वितरणामध्ये पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात यावा. नियमित परतफेड करणाऱ्या व 1 लक्ष रूपये कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना 6 टक्के व्याज माफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. शासनाने दिलेले अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात टाकावे, जेणेकरून पुढील वर्षात व्याज सवलतीचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल. पीक कर्जासाठी कुणाच्या कर्जाचा साक्षीदार असलेल्या शेतकऱ्याचा सीबील बघू नये. प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुले पुर्ण करावी .जागा नसलेल्या लाभार्थ्यांना जागेसाठी मदत करावी. यावेळी संबंधित विभागाच्या विभागप्रमुखांनी योजनेची माहिती दिली. बैठकीला पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

सांसद आदर्श ग्राम योजना
सांसद आदर्श ग्राम योजनेत घाटबोरी ता. मेहकर, घाटपुरी ता. खामगांव, पिंप्री गवळी ता. मोताळा, शेलूद ता. चिखली व धानोरा ता. जळगांव जामोद या गावांचा समोवश करण्यात आला आहे. या योजनेतंर्गत निवडलेल्या गावांमध्ये विविध विभागाच्या समन्वयाने विकासकामे केल्या जाणार आहे. तरी या गावांमधील कामांचा डिपीआर (विस्ततृ प्रकल्प अहवाल) सादर करावा, अशा सूचना यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांनी संबंधित गावातील ग्रामसेवक यांना दिल्या. यावेळी संबंधित गावचे सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.