शासन म्हणते 27 जानेवारीपासून… शाळा-प्रशासन म्हणते अजून गाईड लाईन्सच नाही!; जिल्ह्यातील पावणे दोन लाख पालकांसह विद्यार्थी संभ्रमात

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दस्तुरखुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 5 ते 8 वीचे वर्ग सुरू करण्याचे सूतोवाच केले. मात्र यासंदर्भात जिल्हा प्रशासन वा शिक्षण विभागाला 17 जानेवारीच्या दिवस अखेरीस देखील कोणतेही लेखी निर्देश मिळाले नसल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. यामुळे लाखो पालक, विद्यार्थ्यांत कमालीचा संभ्रम निर्माण झाल्याचे …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दस्तुरखुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 5 ते 8 वीचे वर्ग सुरू करण्याचे सूतोवाच केले. मात्र यासंदर्भात जिल्हा प्रशासन वा शिक्षण विभागाला 17 जानेवारीच्या दिवस अखेरीस देखील कोणतेही लेखी निर्देश मिळाले नसल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. यामुळे लाखो पालक, विद्यार्थ्यांत कमालीचा संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र आहे. याचबरोबर डोक्यावर कोरोना चाचणीची टांगती तलवार असलेले हजारो शिक्षक देखील आतुरतेने निर्देशांची प्रतीक्षा करीत असल्याचे चित्र आहे.

दिवाळीनंतर बहुतेक क्षेत्र अनलॉक करण्यात आले. यामध्ये शैक्षणिक क्षेत्राचा देखील समावेश होता. प्रारंभीच्या टप्प्यात जिल्ह्यातील 9 वी ते 12 वीचे वर्ग सुरू करण्यात आले. यासाठी शिक्षण विभागाला व संस्थांना तारेवरची कसरत करावी लागली. हजारो शिक्षकांच्या कोरोना विषयक चाचण्या व अहवालाने डोकेदुखी वाढल्याचे तेव्हा दिसून आले. या पार्श्‍वभूमीवर शिक्षण मंत्र्यांनी नुकतेच 5 ते 8 वी चे वर्ग 27 जानेवारीपासून सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सांगितले. यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना लवकरच देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र याला चारेक दिवस उलटल्यावरही निर्देश न आल्याने शैक्षणिक वर्तुळासह लाखो पालक, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यु डायसमधील माहितीनुसार जिल्ह्यातील अशा शाळांची संख्या 2475 इतकी आहे. 5 वी ते 12 वी च्या शाळांमधील विद्यार्थी संख्या कमीअधिक 3 लाख 38 हजार इतकी आहे. यातील 5 ते 8 वी मधील सर्व माध्यमांच्या खासगी- शासकीय शाळांमधील विद्यार्थी संख्या 1 लाख 85 हजार इतकी आहे. या 4 वर्गांना शिकविणार्‍या शिक्षकांची निश्‍चित संख्या उपलब्ध नसली तरी ती कमीअधिक 8 हजार असावी. यामुळे हे वर्ग सुरू करायचे तर शिक्षण विभाग व संस्थांना प्रचंड दगदग करावी लागणार आहे. शाळांचे सॅनिटायझेशन, पालकांचे संमतीपत्र, शिक्षकांच्या कोरोना विषयक आरटीपीसीआर चाचण्या, त्यांचे अहवाल संकलन अशा अनेक जबाबदार्‍या पार पाडाव्या लागतील. यामुळे सर्वच घटकांना निर्देशांची आतुर प्रतीक्षा लागली आहे.