शीतल घटोळला अटक, पोलीस कोठडीत रवानगी, ‘हनी ट्रॅप’च्‍या दिशेने तपास

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पहुरजिरा (ता. खामगाव) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाच्या आत्महत्येप्रकरणी जलंब पोलिसांनी काल, 26 मे रोजी अटक केलेल्या पहूरजिरा येथील शिक्षिका शीतल घटोळ (28, रा. स्वामीकृपा अपार्टमेंट, सुटाळा, खामगाव) हिला आज, 27 मे रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाच्या पोलीस कोठडीत तिची रवानगी केली. हा प्रकार हनीट्रॅप असल्याची शक्यता …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पहुरजिरा (ता. खामगाव) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाच्‍या आत्‍महत्‍येप्रकरणी जलंब पोलिसांनी काल, 26 मे रोजी अटक केलेल्या पहूरजिरा येथील शिक्षिका शीतल घटोळ (28, रा. स्वामीकृपा अपार्टमेंट, सुटाळा, खामगाव) हिला आज, 27 मे रोजी न्‍यायालयात हजर केले असता न्‍यायालयाने एक दिवसाच्‍या पोलीस कोठडीत तिची रवानगी केली. हा प्रकार हनीट्रॅप असल्याची शक्‍यता पोलीस सूत्रांनी व्‍यक्‍त केली असून, त्‍यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. या प्रकारात तिचे आणखी कोणी साथीदार आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे.

अशी आहे घटनेची पार्श्वभूमी…

प्रभुदास बोळे (32, रा. पहुरजिरा, ता. खामगाव) यांनी 16 मे रोजी रात्री विष घेऊन घेतले होते. उपचारादरम्यान 18 मेच्या रात्री खामगावातील सिल्वर सिटी हॉस्पिटलमध्ये त्‍यांचा मृत्यू झाला. बोळे यांची पत्‍नी वर्षा बोळे यांनी पोलिसांत तक्रार दिली की त्यांचे पती आणि शिक्षिका शीतल घाटोळ यांची ओळख होती. शीतलच्या पतीचे निधन झाले आहे. ती दोन मुलींसह (सुटाळा ता. खामगाव) येथे राहते.  ती नेहमी प्रभुदास यांना व्हिडिओ कॉल करायची व चॅटिंग करायची. माझ्या मागे कुणी नाही. मला फ्‍लॅट खरेदी करायला मदत करा, असे म्हणत ती नेहमी प्रभुदास बोळे यांच्या घरी यायची. त्‍यांच्यासोबत बोलायची. यावरून प्रभुदास आणि त्यांच्या पत्‍नीत वाद व्हायचे. शीतल फ्‍लॅट खरेदीसाठी प्रभुदास यांना पैसे मागायची. त्यामुळे प्रभुदास तणावात होता. शीतल टॉर्चर करत असल्याने मला आत्महत्या करावीशी वाटत असल्याचे त्यांनी पत्‍नीजवळ बोलताना सांगितले होते. दरम्यान, 16 मे रोजी 8:30 वाजता प्रभुदास जेवण करून चक्कर मारण्याकरिता शेतात गेले होते. मात्र 10:30 वाजूनही ते न परतल्याने पत्‍नीने प्रभुदास यांना फोन केला असता तो फोन कैलास पारसकर यांनी उचलला.

प्रभुदास यांनी विषारी औषध प्राशन केल्याचे सांगितले. प्रभुदास यांना लगेच खामगाव येथे उपचाराकरिता भरती करण्यात आले. 17 मे रोजी सकाळी वर्षा बोळे यांनी स्वतःचे व्हॉट्‌स अॅप मेसेज चेक केले असता त्यात 16 मेच्या रात्री 10:25 वाजता पतीने  केलेले मॅसेज दिसले. त्यामध्ये पतीने  लिहिले होते की “वर्षा मला माफ कर. मी तुला आयुष्यभराची साथ देण्याचे वचन दिले होते. पण मी माझे वचन पूर्ण करू शकलो नाही, माझी सिद्धी खूप भोळी आहे. तिची काळजी घेशील. माझ्या वेदुल्याकडे लक्ष दे. ती खूप गुणी मुलगी आहे. माझ्या मरणाला शीतल घटाळे जबाबदार आहे. तिला सोडू नको. सॉरी आई- बाबांची काळजी घे. यानंतर प्रभूदास बोळे यांचा मोबाइल चालू केला असता त्यात शीतल घटाळे हिचे मॅसेज होते. यामध्ये तिने माझ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यावी लागतील; मी येईल विचारायला. फोन स्वीच ऑफ करून माझी अवस्था बदलणार नाही, आणखी  बिघडेल असे मॅसेज होते. असे प्रभुदास बोळे यांची पत्नी वर्षा बोळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. शीतल घटाळे ही प्रभुदास बोळे यांना भेटून, फोनवरून टॉर्चर करत होती त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. तक्रारीवरून पोलिसांनी शीतल घटोळ (28) हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.