शेकडो बळी घेऊनही देऊळगाव राजा-देऊळगाव मही रस्त्याचे काम धुळखात!; मृत्यूला स्पर्श करण्याचा खेळ रोजचाच!!

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव जालना मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. परंतु अनेक ठिकाणी रस्त्याच्या कामावर हरकती घेण्यात आल्याने तेथील कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे तेथे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्याचे कडे खचले गेल्यामुळे वाहन कोणत्याही क्षणी रस्त्याच्या खाली घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या काही दिवसांत …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव जालना मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. परंतु अनेक ठिकाणी रस्त्याच्या कामावर हरकती घेण्यात आल्याने तेथील कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे तेथे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्याचे कडे खचले गेल्यामुळे वाहन कोणत्याही क्षणी रस्त्याच्या खाली घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या काही दिवसांत छोटे-मोठे अपघात आणि ट्रॅफिक जॅम हा प्रकार या मार्गावरून प्रवास करणार्‍यांना नवीन नाही. त्यामुळे देऊळगाव मही ते देऊळगाव राजा प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

कित्येक वर्षे लोटली, शेकडो बळी घेतले आणि अनेक प्रवासी जखमी होऊनही या रस्त्याचा प्रश्‍न सुटताना दिसत नाही. याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना विचारणा केली असता हा रस्ता आमच्या अधिकार क्षेत्रात नसून तो केंद्र सरकारच्या अधिकार क्षेत्रात असल्याचे उत्तर दिले. प्रशासनाच्या या खेळात सामान्य जनतेचे हाल होत आहेत. सध्या सिंदखेड राजा मार्गाने होणारी जड वाहतूकसुद्धा राहेरी येथील पुल कमकुवत झाल्याने देऊळगावराजा रस्त्याने वळविण्यात आली आहे. त्यामुळे ट्रॅफिकचा अतिरिक्त भार आणि त्यातही रस्त्याचे हे हाल अशी अवस्था झाली आहे. सर्व वाहतूक या मार्गावर वळती करण्यापूर्वी प्रशासनाने या रस्त्याची डागडुजी करायला हवी होती; पण तसे न करताच जड वाहतूक या मार्गाने वळविण्यात आली. त्यामुळे छोटे -मोठे अपघात घडत आहेत. शिवाय धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे.

भाजप करणार आंदोलन

देऊळगाव राजा- देऊळगाव मही रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे .प्रशासनाने लवकर दखल घेऊन रस्त्याचे काम मार्गी लावावे अन्यथा भाजपा च्या वतीने तीव्र जनआंदोलन करण्यात येईल.

– डॉ. सुनील कायंदे, भाजपा नेते

दोन ड्रेससोबत घेऊन जीवघेणा प्रवास

देऊळगाव राजा- देऊळगाव मही रोज दुचाकीने प्रवास करताना दोन ड्रेससोबत घेऊन प्रवास करावा लागतो.रस्त्याने धुळीचे साम्राज्य असते. त्यामुळे अंगावरचे कपडे पूर्ण धुळीने माखले जातात. कामाच्या ठिकाणी पोहोचल्यावर सोबत आणलेला दुसरा ड्रेस परिधान करावा लागतो.

तुषार क्षीरसागर, बँक अधिकारी