शेगावमध्ये तरुणाचा मृतदेह आढळला संशयास्पद स्‍थितीत!; वडिलावर ‘संशय’

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव शहरातील खमुजमदारनगरात तरुणाचा संशयास्पद अवस्थेतील मृतदेह आढळल्याने आज, 16 मे रोजी सकाळी खळबळ उडाली. घातपाताची शक्यता आईने व्यक्त केल्याने पोलिसांनी तरुणाच्या वडिलाला दुपारी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केल्याचे वृत्त आहे. तूर्त पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, चौकशीत काही समोर आले तर खुनाचा गुन्हा नोंद होऊ …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शेगाव शहरातील खमुजमदारनगरात तरुणाचा संशयास्‍पद अवस्‍थेतील मृतदेह आढळल्‍याने आज, 16 मे रोजी सकाळी खळबळ उडाली. घातपाताची शक्‍यता आईने व्‍यक्‍त केल्‍याने पोलिसांनी तरुणाच्‍या वडिलाला दुपारी ताब्‍यात घेऊन चौकशी सुरू केल्‍याचे वृत्त आहे. तूर्त पोलिसांनी आकस्मिक मृत्‍यूची नोंद केली असून, चौकशीत काही समोर आले तर खुनाचा गुन्‍हा नोंद होऊ शकतो, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

सलीम कासम शेख (19, रा. खमुजमदारनगर, शेगाव) मृत्‍यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्‍याची आई जेबुन्निसा कासम शेख हिने शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली, की त्‍यांना दोन मुले व चार मुली आहेत. पतीसोबत भांडण झाल्याने सध्या त्‍या माहेरी माटरगाव येथे राहतात. मुलगा सलीम मिस्‍त्री काम करतो. एक महिन्यापासून सैलानीला तो कामानिमित्त गेला होता. मुलगी शमीम परवीन हिचे 17 मे रोजी लग्न असल्याने तो 15 मे रोजी दुपारी दोनला शेगावला आला होता. तेथून त्याचा फोन आला की रात्री शेगावला थांबणार.

आज 16 मे रोजी सकाळी सहाच्या सुमारास जेबुन्निसा यांचे काका इनायतउल्ला खाँ यांच्‍या मोबाइलवर कॉल आला की, सलीम हा गरीब नवाज मशिदीच्या स्टोअर रूममध्ये मृतावस्‍थेत पडलेला आहे. ही माहिती मिळताच जेबुन्निसा या मुली, मुलासह सकाळी सातला शेगावला आल्या. मृतदेह कुणीतरी घराच्या खाटावर टाकलेला होता. त्याच्या गळ्यावर काळे व्रण दिसले. मुलाच्‍या मृत्यू प्रकरणी पती कासम शेखवर त्‍यांनी संशय व्‍यक्‍त केला असून, पतीविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करावी, असे त्‍यांनी तक्रारीत म्‍हटले आहे. पोलिसांनी दुपारी तीनला कासमला ताब्‍यात घेतले असून, त्‍याची चौकशी सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.