शेगावमध्ये शिवसेना-भाजप हम साथ साथ हैं…. विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्याच्या सत्तेत भलेही एकमेकांचे तोंड पाहण्यासही नकार देणारे शिवसेना-भाजप शेगाव नगर परिषदेत मात्र एकत्र आहेत. आजही, 21 जानेवारीला विषय समित्यांच्या निवडीत ते साथ साथ दिसून आले.शेगाव नगर परिषदेत विषय समित्यांची निवड महिनाभरापासून रखडली होती. अखेर आज, 21 जानेवारी रोजी निवडणूक अधिकारी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाल व सहाय्यक निवडणूक …
 

शेगाव (ज्ञानेश्‍वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्याच्या सत्तेत भलेही एकमेकांचे तोंड पाहण्यासही नकार देणारे शिवसेना-भाजप शेगाव नगर परिषदेत मात्र एकत्र आहेत. आजही, 21 जानेवारीला विषय समित्यांच्या निवडीत ते साथ साथ दिसून आले.
शेगाव नगर परिषदेत विषय समित्यांची निवड महिनाभरापासून रखडली होती. अखेर आज, 21 जानेवारी रोजी निवडणूक अधिकारी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाल व सहाय्यक निवडणूक अधिकारी मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांच्या उपस्थितीत नगर परिषदमध्ये निवड प्रक्रिया पार पडली. नगर परिषदेत भाजपला स्पष्ट बहुमत असून शिवसेना सुद्धा त्यांच्यासोबत आहे. या अगोदर सुद्धा शिवसेनेला एक सभापतीपद दिलेले होते. आज शैलेश डाबेराव यांची शिक्षण सभापती पदी निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे मंगलाताई कमलाकर चव्हाण यांची आरोग्य सभापतीपदी, राजेश साहेबराव कलोरे यांची बांधकाम सभापती पदी, पवन महाराज शर्मा यांची पाणीपुरवठा सभापती तसेच सौ. मालाताई देशमुख यांची महिला बालकल्याण सभापतीपदी निवड करण्यात आली असून स्थायी समिती सदस्यपदी सौ. प्रितीताई शेगोकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सत्ताधार्‍यांचा कार्यकाळ चार वर्षांचा होत आहे. सकाळी जवळपास साडे अकरा वाजता सत्ताधारी पक्षातील नगरसेवक, नगराध्यक्ष यांनी नगरपरिषदेमध्ये प्रवेश केला. तद्नंतर निवडणूक अधिकार्‍यांसमोर सर्व सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी शेगावच्या नगराध्यक्षा सौ. शकुंतलाताई पांडुरंग बुच, गटनेते शरद शेठ अग्रवाल, भाजपा नेते विजयबापू देशमुख, शिवसेना शहराध्यक्ष संतोष घाटोळ, माजी आरोग्य सभापती राजेश चांडक, माजी पाणीपुरवठा सभापती गजानन जवंजाळ व सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक उपस्थित होते.