शेगावातून हळूहळू श्वान महाशय होणार गायब!; निर्बिजीकरणास सुरुवात

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव शहरात मोकाट कुत्र्यांची धरपकड नगरपालिकेने सुरू केली आहे. नगर परिषदेचा आरोग्य विभाग आणि सोसायटी फॉर अॅनिमल प्रोटेक्शन (सॅप) कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या श्वानांचे निर्बिजिकरण व अॅन्टी रेबीज लसीकरण मोहिमेचा शुभारंभ नगराध्यक्षा सौ. शकुंतलाताई बुच यांच्या हस्ते काल, 13 फेब्रुवारीला करण्यात आला. मागील दोन ते तीन …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शेगाव शहरात मोकाट कुत्र्यांची धरपकड नगरपालिकेने सुरू केली आहे. नगर परिषदेचा आरोग्य विभाग आणि सोसायटी फॉर अ‍ॅनिमल प्रोटेक्शन (सॅप) कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या श्वानांचे निर्बिजिकरण व अ‍ॅन्टी रेबीज लसीकरण मोहिमेचा शुभारंभ नगराध्यक्षा सौ. शकुंतलाताई बुच यांच्या हस्ते काल, 13 फेब्रुवारीला करण्यात आला.

मागील दोन ते तीन वर्षांपासून शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. कुत्र्यांच्या झुंडी शहरातील गल्ली, चौकांतून फिरताना दिसतात. नागरिकांना चावा घेणे, दुचाकी वाहनाचा पाठलाग करणे आदीमुळे शहरातील नागरिक त्रस्त व भयभीत झाले होते. त्यामुळे नगर परिषदेकडून भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त व्हावा अशी मागणी नागरिकांकडून सतत केली जात होती. न. प. प्रशासनाकडून आश्वासनाशिवाय काहीही केले जात नव्हते. अखेर उशीराने का होईला आजपासून न.प.प्रशासनाकडून ठोस कारवाईस प्रारंभ करण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. यावेळी न. प. उपाध्यक्षा सौ. ज्योतीताई कलोरे, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके, आरोग्य सभापती सौ. मंगलाताई चव्हाण, पाणी पुरवठा सभापती पवन शर्मा, नगरसेविका सौ. सुषमा शेगोकार, सौ. अलका खानझोडे, राजू अग्रवाल, दीपक ढमाळ, नितीन शेगोकार, ज्ञानेश्वर साखरे, संतोष खंडारे, अशोक चांडक, कमलाकर चव्हाण, विनायक भारंबे, चांद कुरेशी यांची उपस्‍थिती होती. उपअभियंता मोकासरे, आरोग्य निरीक्षक समाधान जायभाये, प्रल्हाद हातेकर, सुभाष चावरे, चंद्रकांत तिकोटे, पवन चावरे, नाजुक इंगळे आदी कर्मचार्‍यांची उपस्थिती होती.

अशी राबवणार मोहीम…

कुत्र्यांच्‍या निर्बिजीकरणाची सुरुवात रोज सकाळी 5.30 वाजतापासून होईल. यात कुत्र्यांना जाळ्यांचा तसेच स्किलचा वापर करून पकडले जाईल. त्यावेळी कुत्र्यांना ताब्यात घेतलेल्या ठिकाणी एक नंबर दिला जाईल व तोच नंबर कुत्र्याच्या कानावरही दिला जाईल. पुढे सेंंटरवर आणून लसीकरण वगैरे प्रक्रिया व नंतर नसबंदी केली जाईल. या सर्व प्रक्रिया तीन दिवसांमध्ये केल्या जातील. त्यानंतर पकडलेल्या कुत्र्याला जेथून ताब्यात घेतले. त्याचठिकाणी आणून सोडले जाईल. नसबंदी झाल्यामुळे नव्याने पिल्ले जन्माला येणे बंद होईल. तसेच विशेषत: श्रावण, भाद्रपद महिन्यामध्ये विशिष्ट कारणास्तव कुत्र्यांच्या झुंडी रस्त्यांवरून धावण्याचे प्रकार दिसतात. या गोष्टी नसबंदीमुळे कमी होतील, अशी माहिती सॅपकडून देण्यात आली आहे.याकरिता 12 जणांची सॅपची टीम आहे. सचिन देऊळकर व विजय पाटील यांच्या देखरेखीत ही टीम कार्य करणार आहे. तसेच भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण शस्त्रक्रिया व अ‍ॅन्टी रॅबीस लसीकरण पशुवैद्यकीय तज्ज्ञडॉ.राहुल बोंबटकार यांच्या निदर्शनाखाली केले जाणार आहे.