संचारबंदी चोरट्यांच्‍या पथ्यावर! बुलडाण्यात घर फोडले; मोटारसायकलचीही चोरीचा; शेगावातूनही दुचाकी केली गायब!!

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात रात्री संचारबंदी लागू असली तरी चोरट्यांचा मात्र मुक्तसंचार सुरू असल्याचे चित्र आहे. बुलडाणा शहरात चैतन्यवाडीत एक घरफोडीची घटना समोर आली आहे. राजगुरे ले आऊटमधून दुचाकी चोरी गेली आहे. दुसरीकडे शेगाव शहरातही मोटारसायकल चोरीस गेल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.बुलडाणा शहरातील चैतन्यवाडीतील रहिवासी सौ. उल्का …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात रात्री संचारबंदी लागू असली तरी चोरट्यांचा मात्र मुक्तसंचार सुरू असल्याचे चित्र आहे. बुलडाणा शहरात चैतन्यवाडीत एक घरफोडीची घटना समोर आली आहे. राजगुरे ले आऊटमधून दुचाकी चोरी गेली आहे. दुसरीकडे शेगाव शहरातही मोटारसायकल चोरीस गेल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
बुलडाणा शहरातील चैतन्यवाडीतील रहिवासी सौ. उल्का गजानन अंतरकर या व्यवसायाने शिक्षिका आहेत. त्यांचे पती गजानन अंतरकरसुद्धा शिक्षक असून, एडेड हायस्‍कूल बुलडाणा येथे नोकरी करतात. गजानन अंतरकर आजारी असल्याने दोघे पती – पत्नी कारंजा लाड (जि. वाशिम) येथे 11 मार्चपासून उपचारासाठी गेले होते. दरम्यान 25 मार्च रोजी सकाळी त्यांच्या शेजाऱ्यांना अंतरकर यांचे घर उघडे असल्याचे दिसले. त्यांना चोरीचा संशय आल्याने त्यांनी ही बाब अंतरकर यांना फोनवरून कळवली. त्यामुळे अंतरकर संध्याकाळी घरी आले असता त्यांना दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. घरातील बेडरूममधील कपाट तोडून नगदी 30 हजार रुपये, प्रत्येकी 10 ग्रॅम सोन्याच्या 2 बांगड्या, चांदीचे 10 नग शिक्के 100 ग्रॅमचे, तसेच चांदीची काही भांडी असा आजच्या बाजार भाव किमतीनुसार दीड ते पावणे दोन लाख रुपयांचा माल चोरीला गेल्याचे आढळून आले. यासोबतच आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड व बँकेचे पासबुकही चोरल्याची तक्रार सौ. उल्का गजानन अंतरकर यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या घटनेत बुलडाणा शहरातील राजगुरे ले आउटमध्ये राहणारे प्रवीण रवींद्रनाथ महाले यांनी त्यांची दुचाकी चोरी झाल्याची तक्रार शहर पोलिसांत दिली आहे. पेंटर असणारे महाले यांनी दुचाकी त्यांच्या घरासमोर उभी केली होती. 25 मार्चला सकाळी उठून बघितल्यानंतर त्यांना मोटारसायकल दिसून आली नाही. दिवसभर शोधाशोध केल्यानंतर त्यांनी त्यांची एचएफ डिलक्स कंपनीची (एमएच 28 बीएच 0665) मोटारसायकल चोरी झाल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दिली. तक्रारीवरून पोलिसांनी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मोटारसायकल चोरीची आणखी एक घटना शेगाव शहरात समोर आली आहे. शेगाव शहरातील इदगाह प्लॉट परिसरात राहणारे शकिल खान बुढन यांनी चोरट्याने दुचाकी चोरल्याची तक्रार शेगाव शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. बुढन यांनी त्यांच्या बाळापूर येथील नातेवाईकाची एचएफ डिलक्स कंपनीची दुचाकी (क्र. एमएच 30 बीई 1501) वापरण्यासाठी आणली होती. दुचाकी त्यांनी रात्री घराबाहेर उभी करून ठेवली होती. मात्र सकाळी उठल्यानंतर दुचाकी गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. शोध घेऊनही दुचाकी न मिळाल्याने त्यांनी पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला.