संतप्त शेतकरी कुर्‍हाड हातात घेऊन ‘समृद्धी’चे काम बंद पाडतो तेव्हा…; मेहकर तालुक्यातील खळबळजनक घटना

मेहकर (विष्णू आखरे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा जिल्ह्यातून जाणार्या समृद्धी महामार्गाच्या कामामुळे ठेकेदाराच्या मनमानीचा फटका शेतकर्यांना बसत आहे. मागील 2 वर्षांपासून महामार्गाला लागून असलेल्या शेतीतील उत्पन्नत कमालीची घट होत आहे. त्यामुळे आज, 20 जानेवारीला मेहकर तालुक्यातील एका संतप्त शेतकर्याने हातात कुर्हाड घेऊन समृद्धी महामार्गाचे काम बंद पाडले. शेतकर्याचा हा अवतार पाहून ठेकेदार …
 

मेहकर (विष्णू आखरे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा जिल्ह्यातून जाणार्‍या समृद्धी महामार्गाच्या कामामुळे ठेकेदाराच्या मनमानीचा फटका शेतकर्‍यांना बसत आहे. मागील 2 वर्षांपासून महामार्गाला लागून असलेल्या शेतीतील उत्पन्नत कमालीची घट होत आहे. त्यामुळे आज, 20 जानेवारीला मेहकर तालुक्यातील एका संतप्त शेतकर्‍याने हातात कुर्‍हाड घेऊन समृद्धी महामार्गाचे काम बंद पाडले. शेतकर्‍याचा हा अवतार पाहून ठेकेदार व त्याचे कामगार, टिप्पर व वाहनचालक सुद्धा घाबरले होते.

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातून समृद्धी महामार्ग जात आहे. सध्या या महामार्गाचे काम सुरू असून या महामार्गाच्या खालच्या बाजूला अप्रोच रस्ता आहे व याच मार्गावरून दिवसभर महामार्गाच्या कामावरील ट्रक, टिप्पर व इतर वाहने येणे-जाणे करत असतात. या वाहनांच्या धुळीमुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. मेहकर तालुक्यामध्ये 36 किलोमीटर समृद्धी महामार्गाचे कंत्राट अ‍ॅपको कंपनीला मिळालेले आहे. सध्या तूर, हरभरा, गहू शेतकर्‍यांच्या शेतामध्ये उभा आहे. हरभरा व तूर ही काढणीला आलेली आहे. मात्र धुळीमुळे शेतकरी त्रस्त झालेला आहे. याच धुळीमुळे मजूर शेतात कामाला येत नाही. तूर, हरभरा, गहू व सोयाबीन या पिकांचे धुळीमुळे नुकसान होत आहे. समृद्धीचे काम करणार्‍या कंपनीने नियमाप्रमाणे दिवसातून 3 वेळा या रस्त्याला पाणी मारले पाहिजे. जेणेकरून धूळ उडणार नाही. परंतु कंत्राटदार रस्त्यावर पाणीच मारत नसल्याने संतप्त शेतकरी अनिरुद्ध तांगडे (रा. कल्याण) चक्क हातात कुर्‍हाड घेऊन रस्त्यावर उभा राहिला. ठेकेदाराची वाहने अडवून गाड्या बंद केल्या होत्या. संबंधित अधिकारी बोलवा. त्या शिवाय ठेकेदाराचे वाहन पुढे जाऊ देणार नाही, मी कोणाच्या दारी जाऊन निवेदन सुध्दा देणार नाही. अधिकार्‍यांनी माझ्या शेतामध्ये येऊन माझ्याशी बोलले पाहिजे, अशी भूमिका या शेतकर्‍याने घेतल्यानंतर अ‍ॅपको कंपनीच्या अधिकार्‍यांची एकच तारांबळ उडाली. दिवसभर या शेतकर्‍याचा हा रौद्रावतार कायम होता. रात्री समृद्धीचे काम बंद राहत असल्याने हा शेतकरी घरी निघून आला. पण उद्या, 21 जानेवारीला सकाळी पुन्हा तो आपले आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.