संतापजनक… दहा वर्षीय मुलीवर तरुणाचा लैंगिक अत्याचार!; जळगाव जामोद तालुक्यातील खळबळजनक घटना

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दहा वर्षीय मुलीवर तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे समोर आली आहे. 9 जानेवारीला घडलेल्या या घटनेप्रकरणी 10 जानेवारीला तक्रार देण्यात आली आहे. मुलीने आरोपीला ओळखले आहे. अनिकेत श्रीकृष्ण लाहुडकार (रा. सुनगाव) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीचे …
 

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दहा वर्षीय मुलीवर तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे समोर आली आहे. 9 जानेवारीला घडलेल्या या घटनेप्रकरणी 10 जानेवारीला तक्रार देण्यात आली आहे. मुलीने आरोपीला ओळखले आहे. अनिकेत श्रीकृष्ण लाहुडकार (रा. सुनगाव) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पीडित मुलीचे कुटुंबिय सुनगाव शिवारात एका शेतकर्‍याची शेती बटाईने करतात. शेतातच टिनपत्र्याच्या खोलीत राहतात. 9 जानेवारीला ते सुनगाव येथील आठवडे बाजारात गेले होते. यावेळी घरी केवळ त्यांची दहा वर्षीय मुलगी व एक तीन वर्षीय मुलगी दोघीच होत्या. सायंकाळी आई-वडील घरी आल्यानंतर त्यांना मुलगी रडत असल्याचे दिसले. त्यांनी तिला विचारणा केली असता तिने सांगितले, की गावातील एक मुलगा घरी सायकलवर आला आणि त्याने पिण्यासाठी पाणी मागितले. पाणी दिल्यानंतर त्याने घरात येत दरवाजा आतून लावून घेत लैंगिक अत्याचार केला. मुलीने आरडाओरड केल्यानंतर त्याने तिचे तोंड दाबून कुणाला काही सांगितले तर जीवे मारून टाकेन, अशी धमकी दिली. आरोपीचे वर्णन मुलीने केले. त्यानुसार त्याने लाल-काळे टी शर्ट घातलेले होते. या आरोपीला शोधण्यासाठी तिचे वडील मुलीला घेऊन गावात गेले. मात्र गावात तो दिसला नाही. 10 जानेवारीला तिच्या वडिलांनी आरोपीचा शोध सुरू केला असता मुलीला आरोपी शेतातून जाताना दिसला. तिने लगेच वडिलांना सांगितले. तिच्या वडिलांनी त्याला ताब्यात घेत विचारणा केली असता त्याने त्याचे नाव अनिकेत श्रीकृष्ण लाहुडकार (रा. सुनगाव) असे सांगितले. त्याला पाहून मुलगी घाबरून रडायला लागल्याने त्याने तिथून पळ काढला. तिच्या पित्याने तातडीने मुलीला सोबत घेऊन जळगाव जामोद पोलीस ठाणे गाठून अनिकेत लाहुडकारविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. त्यावरून पोलिसांनी या प्रकरणात लैंगिक अत्याचार, पोस्कोचा गुन्हा दाखल केला आहे.