सचिवाचे विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळ्याची बातमी आली अन्‌ शिपायावर डुख धरून छळवाद सुरू झाला… अन्‍नत्‍यागानंतर शिपायाने सोडले प्राण; रूखाई कन्या विद्यालयाच्‍या सचिव, कोषाध्यक्षा, मुख्याध्यापिका, लिपिकाविरुद्ध गुन्‍हा दाखल

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः संस्थाचालकांच्या छळाला कंटाळून शिपायाने अन्नत्याग करत प्राण सोडल्याची धक्कादायक घटना बुलडाण्यात समोर आली आहे. या तक्रारीवरून धाड पोलिसांनी रूखाई कन्या विद्यालयाचे सचिव दीपक त्र्यंबक पाटील, कोषाध्यक्षा आरती त्रयंबकराव पाटील, मुख्याध्यापक वर्षा राजधरसिंह राजपूत, लिपिक दिनेश धोंडू फासे या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मृतक शिपायाचे मावस भाऊ सेवानिवृत्त …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः संस्‍थाचालकांच्‍या छळाला कंटाळून शिपायाने अन्‍नत्‍याग करत प्राण सोडल्याची धक्‍कादायक घटना बुलडाण्यात समोर आली आहे. या तक्रारीवरून धाड पोलिसांनी रूखाई कन्या विद्यालयाचे सचिव दीपक त्र्यंबक पाटील, कोषाध्यक्षा आरती त्रयंबकराव पाटील, मुख्याध्यापक वर्षा राजधरसिंह राजपूत, लिपिक दिनेश धोंडू फासे या चौघांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. या प्रकरणी मृतक शिपायाचे मावस भाऊ सेवानिवृत्त प्राचार्य डाॅ. उत्तम बिदेशसिंह राजपूत (रा. शिक्षक कॉलनी, जिजामाता नगर, बुलडाणा) यांनी तक्रार दिली आहे. ३० जुलै २०२१ रोजी रात्री साडेअकराच्‍या सुमारास या शिपायाचा मृत्‍यू झाला असून, एवढे छळण्याचे कारणही मोठे विचित्र आहे. दीपक पाटील याने विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याची बातमी १९९८ मध्ये देशोन्‍नतीत छापून आली होती. ही बातमी शिपायानेच दिल्याचा संशय बाळगून त्‍यानंतर त्‍याच्‍यावर सूड उगवण्यात आल्याचे तक्रारीत म्‍हटले आहे.

डॉ. राजपूत यांनी तक्रारीत म्‍हटले आहे, की त्‍यांचे मावसभाऊ विजयसिंग रामसिंग पाटील (रा. सातगाव म्हसला ता. बुलडाणा) हे सन १९९१ ला शाळा स्थापन झाल्यापासून बुलडाण्यातील रूखाई कन्या विद्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होते. ही शाळा श्री गणेशा शिक्षण संस्था संचालित आहे. त्‍या काळात संस्‍थेचे सचिव दीपक पाटील त्‍यावेळी मुंबई राहत होते. २१ डिसेंबर १९९८ मध्ये ते एकटेच बुलडाणा येथे आले. त्यांनी २२ डिसेंबर १९९८ ला शाळा चालू असताना शिपाई विजयसिंह पाटील यांना आठवीतील एका विद्यार्थिनीला त्यांच्या खोलीत बोलाविण्यास सांगितले. तिला बोलावून आणल्यानंतर खोलीत तिला घेतल्यानंतर शिपाई विजयसिंह यांना दूध आणण्यासाठी पाठविले आणि खोलीची कडी आतून लावून घेतली होती. शिपाई विजयसिंह हे दूध घेऊन परत आले तेव्हा विद्यार्थिनी खोलीतून रडत रडत बाहेर येत होती. ते दृश्य पाहून शिपाई विजयसिंह यांनी तिचे दप्तर खाली आणून देऊन तिला घरी पाठवून दिले. त्‍यानंतर लगेचच सचिव दीपक पाटील कोणालाही काही न सांगता मुंबईला निघून गेले. मात्र विद्यार्थिनीसोबतच्‍या अश्लील चाळ्यांची बातमी देशोन्‍नतीत प्रसिद्ध झाली.

त्‍यामुळे बदनामी झाल्‍याचा राग दीपक पाटील याला आला आणि ही माहिती शिपाई विजयसिंह यांनीच बातमीदाराला पुरवल्याचा संशय घेतला. त्‍यानंतर विजयसिंह यांचा छळ सुरू झाला. हजेरी मस्टरवर सही न करू देणे, पगार न काढणे, कामावर येऊ न देणे या प्रकारचा त्रास दिल्याचे विजयसिंह यांनी डॉ. राजपूत यांना सांगितले होते, असे तक्रारीत म्‍हटले आहे. पैशांअभावी विजयसिंह यांची पत्नी इंदूमती पाटील यांचे निधन झाले. नंतर विजयसिंह यांच्‍यावर खोटे आरोप लावून त्यांच्‍यावर एकतर्फी कार्यवाही करून नोकरीवरूनही काढून टाकण्यात आले. त्यांचा पेन्शनचा प्रस्‍ताव शिक्षणधिकाऱ्यांनी श्री गणेशा संस्थेला वारंवार निदर्शनास आणून देऊनसुध्दा सादर न करणे, त्‍यांना ग्रॅच्युटी न देेणे, रजा रोखीकरण न देणे अशा प्रकारे त्रास कायम राहिला. या त्रासाला कंटाळून विजयसिंह यांनी गेल्या वर्षी ऑगस्टपासून घरी सातगाव म्‍हसला येथे अन्नत्‍याग सुरू केला होता. अखेर ३० जुलै २०२१ रोजी रात्री साडेअकराला त्‍यांची प्राणज्‍योत मालवली.

आत्‍महत्‍येस यांना ठरवले कारणीभूत
सचिव दीपक त्र्यंबक पाटील, ५८, रा. रूखाई कन्या विद्यालय, बुलडाणा, कोषाध्यक्षा आरती त्र्यंबकराव पाटील (५१ रा. रूखाई कन्या विद्यालय, बुलडाणा), मुख्याध्यापक वर्षा राजधरसिंह राजपूत (५२ मुख्याध्यापक, रा. महावितरण कार्यालयामागे, अष्टविनायकनगर, बुलडाणा), लिपिक दिनेश धोंडू फासे (४५, रा. अष्टविनायकनगर बुलडाणा) या सर्वांनी मिळून सन २००७ पासून ३० जुलैपर्यंत विजयसिंह पाटील यांचा छळ केला. त्‍यामुळेच त्‍यांनी अन्‍नत्याग करून आत्‍महत्‍या केली, असे तक्रारीत म्‍हटले आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक श्री. अपसुंदे करत आहेत.