समस्या मांडायला गेले, मुख्याधिकारी गैरहजर पाहून दालनाला घातला “बेशरमा’चा हार!; चिखलीतील प्रकार

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली नगरपरिषदेच्या गलथान कारभाराचे किस्से सध्या जिल्हाभर गाजत आहे. कालच एक दुमजली जीर्ण इमारतीचा भाग कोसळून वाहनधारक बालंबाल बचावले. आज, २३ जुलैला दुपारी दोनच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपरिषदेच्या कारभाराचा पंचनामा करत गैरहजर मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाला बेशरमाच्या पानांचा हार चढवला. नालेसफाई न झाल्याने नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी घुसत आहे. याशिवाय पिण्याच्या पाण्याच्या …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली नगरपरिषदेच्‍या गलथान कारभाराचे किस्‍से सध्या जिल्हाभर गाजत आहे. कालच एक दुमजली जीर्ण इमारतीचा भाग कोसळून वाहनधारक बालंबाल बचावले. आज, २३ जुलैला दुपारी दोनच्‍या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपरिषदेच्‍या कारभाराचा पंचनामा करत गैरहजर मुख्याधिकाऱ्यांच्‍या दालनाला बेशरमाच्‍या पानांचा हार चढवला. नालेसफाई न झाल्याने नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी घुसत आहे. याशिवाय पिण्याच्या पाण्याच्‍या समस्येवर चर्चा करण्यासाठी “राष्ट्रवादी’चे शिष्यमंडळ गेले होते.

चिखली नगर परिषदेत भाजपची सत्ता आहे. विकासकामांमध्ये गैरव्यवहाराचे आरोप झाल्यापासून मुख्याधिकारी अभिजित वायकोस सातत्याने गैरहजर असतात. चिखली शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नालेसफाई ,घाण, रस्ते या प्रश्नांची सोडवणूक करणे मुख्याधिकाऱ्यांचे कर्तव्य असताना ते कुंभकर्णी झोपेत आहेत. शहरात डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढत आहेत. मात्र मुख्याधिकारी हे निवासस्थानावरून फक्त बिले काढण्याचे काम करतात, असा आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने केला.

शहरातील समस्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी नगर परिषद कार्यालयात पोहोचले होते. मात्र मुख्याधिकारी गैरहजर असल्याने संताप व्यक्त करत त्यांच्या दालनाला बेशरमाच्या पानांचा हार घालण्यात आला. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. मुख्याधिकाऱ्यांना नगर परिषदेत हजर राहण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली. या वेळी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष प्रमोद पाटील, शहराध्यक्ष रवींद्र तोडकर, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेखर बोंद्रे, सुभाष देव्हडे, प्रशांत डोंगरदिवे, विशाल काकडे, प्रमोद चिंचोले, संकेत पाटील, दीपक कदम, शेख युसूफभाई, दिनेश शर्मा, सागर खरात, अभिजित शेळके, शुभम कापसे, बजरंग गोंधने, श्री. देशमुख आदी उपस्थित होते.