‘समृद्धी’चं काम बिनडोक ठेकेदार करत आहे का हो? ब्लास्टिंगची दगडं उठली शेतकर्‍यांच्या जिवावर, बैलही झाले जखमी!; देऊळगाव राजा तालुक्यातील संतापजनक प्रकार

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतकर्यांना जमिनीचा मोबदला देण्यात चालढकल केली जात असली तरी समृद्धी महामार्गाचे काम देऊळगाव राजा तालुक्यात मात्र जोरदार सुरू आहे. मात्र हे काम जणू बिनडोकपणाने होत असल्याचे दिसून येत आहे. महामार्गासाठी डोंगर भागावरील खोदाईचे काम व कडक भागात ब्लास्टिंग, बार घेण्यात येत आहेत. पण ते घेताना काळजी …
 

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतकर्‍यांना जमिनीचा मोबदला देण्यात चालढकल केली जात असली तरी समृद्धी महामार्गाचे काम देऊळगाव राजा तालुक्यात मात्र जोरदार सुरू आहे. मात्र हे काम जणू बिनडोकपणाने होत असल्याचे दिसून येत आहे. महामार्गासाठी डोंगर भागावरील खोदाईचे काम व कडक भागात ब्लास्टिंग, बार घेण्यात येत आहेत. पण ते घेताना काळजी घेतली जात नसल्याने ब्लास्टिंगच्या धुरात श्‍वास गुदमरत आहे. ब्लास्टिंंगचे दगड घरावर आदळत आहेत. हेच दगड लागून बिचारे मुके प्राणी जखमी होत आहेत. शेतकर्‍यांच्या तक्रारींनंतर बुलडाणा लाइव्हने जाऊन पाहणी केली असता हा धक्कादायक प्रकार दिसून आला.

आज, 7 सकाळी झालेल्या ब्लास्टिंगमध्ये गोळेगाव येथील शेतकरी गिरधारी आसाराम कोल्हे यांच्या घरावर व दोन बैलांवर ब्लास्टिंगचे अनेक दगड आदळले. बैल यात जखमी झाले आहेत. हे रोजचेच झाले असून, मुक्या प्राण्यांना बांधावे तरी कुठे आणि त्यांचे कसे संरक्षण करावे, असा प्रश्‍न शेतकर्‍यांना पडला आहे. बैलाच्या जिवाला तर धोका आहेच, पण शेतकर्‍यांनाही कधी डोक्यात दगड येऊन पडेल याची धास्ती राहते. घरांवर पत्रांना दगडांमुळे छिद्र पडले आहेत. या ब्लास्टिंगचा धूर आसपासच्या गावांचे आरोग्य धोक्यात आणत आहे. शेतकरी गिरधारी कोल्हे यांनी सांगितले की, आमची जमीन या महामार्गात गेली आहे. परंतु अजून आम्हाला आमच्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही. आम्हाला आधिकारी उडवाउडवीचे उत्तर देतात. तसेच ठेकेदार कदम आम्हाला सांगतात की जा कोणाकडेही जा. मागच्या वेळेस आम्ही बैलगाडी लावून या महामार्गाचे काम बंद पाडले होते. तेव्हा आम्हाला शब्द देण्यात आला होता की पंधरा दिवसांत तुमचे पैसे तुमच्या खात्यावर जमा करू. परंतु ते त्यांच्या शब्दाला कायम राहिलेे नाहीत. आज माझ्या घरावर दगडे पडली, ज्यांच्या भरवशावर माझी शेत चालते ती मुकी जनावरे जखमी झाल्यावर आम्ही शेती कशी करायची? मला जर माझ्या जमिनीचा मोबदला मिळाला असता तर मी माझे घर व माझे जनावरे यांची व्यवस्था दुसरीकडे केली असती, असे हताश उद्गार त्यांनी काढले.

आता माघार घेणार नाही….

जमिनीचा मोबदला येत्या दोन दिवसांत दिला नाही तर मी या महामार्गाचे काम पुन्हा बैलगाडी लावून बंद पाडणार आहे आणि यावेळी माघार घेणार नाही.

– शेतकरी गिरधारी कोल्हे

शेतकरी नेते कुठे हरवले?

एरव्ही शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी प्रसिद्धी लोलुपता दाखवणारे शेतकरी नेते कुठ हरवलेत, असा प्रश्‍न या भागातील शेतकरी करत आहेत. या भागातील शेतकर्‍यांच्या वेदना, त्रास त्यांना दिसत नाही का? असा सवालही त्यांनी केला आहे.