सरपंच महिलेसह पदाधिकाऱ्यांचे उपोषण तेही पाण्याच्‍या टाकीवर!; वळती येथील प्रकार, आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी अधिकाऱ्यांना घेऊन गाठले गाव!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जलस्वराज योजनेतून मंजूर झालेले विहिरीचे व जलवाहिनीचे अर्धवट काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी वळती (ता. चिखली) येथील ग्रामपंचायत सरपंच आणि सर्व सदस्यांनी आज, 22 मार्चला अनोखे आंदोलन केले.जागतिक जल दिनाचे औचित्य साधून सरपंच उज्ज्वलाबाई चिंचोले व सर्व ग्रामपंचायत सदस्य पाण्याच्या टाकीवर उपोषणाला बसले. ही माहिती आमदार श्वेताताई महाले यांना कळताच त्यांनी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जलस्वराज योजनेतून मंजूर झालेले विहिरीचे व जलवाहिनीचे अर्धवट काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी वळती (ता. चिखली) येथील ग्रामपंचायत सरपंच आणि सर्व सदस्यांनी आज, 22 मार्चला अनोखे आंदोलन केले.जागतिक जल दिनाचे औचित्य साधून सरपंच उज्‍ज्वलाबाई चिंचोले व सर्व ग्रामपंचायत सदस्य पाण्याच्या टाकीवर उपोषणाला बसले. ही माहिती आमदार श्वेताताई महाले यांना कळताच त्यांनी लगेच पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी श्री. वारे यांना सोबत घेऊन वळती गाठले. 15 दिवसांत अर्धवट काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याने काही तासांतच श्वेताताईंच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले.
चिखली तालुक्यातील वळती गावाला सन 2015 मध्ये जलस्वराज्य योजनेतून विहीर मंजूर झाली आहे. विहिरीचे बांधकाम व गावातील जलवाहिनीचे काम गेल्या 3 वर्षांपासून रखडलेले होते. ग्रामपंचायतीने वेळोवेळी पाठपुरावा करूनही ठेकेदाराने व पाणीपुरवठा विभागाने दुर्लक्ष केल्याचे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.अपुऱ्या कामामुळे वळती ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. उपोषणाला शेकडो ग्रामस्थ व महिलांनी पाठिंबा दिला होता. उपोषणात सरपंचांसह उपसरपंच शे. अस्लम शे. हमीद, सुनील चिंचोले, भारत गायकवाड, मोसीम खाँ हबीब खाँ, सौ. मंदा हिवाळे, राधाबाई जगताप,दुर्गा धनवे, तबसुम परवीन, उबेद पटेल यांचा समावेश होता.