सव्वा लाखासाठी अवैध सावकाराने हडपली साडेतीन कोटींची प्रॉपर्टी!; साखरखेर्ड्यातील धक्‍कादायक प्रकार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मुलीच्या लग्नासाठी सव्वा लाख रुपये घेतले खरे, पण त्यापोटी अवैध सावकाराने वृद्धाची तब्बल सव्वा तीन कोटी रुपयांची मालमत्ता हडपली. जिल्हा उपनिबंधकांकडे याप्रकरणी तक्रार करण्यात आल्यानंतर त्यांनी चौकशी करून साखरखेर्डा पोलिसांना या अवैध सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. मात्र 15 दिवस उलटूनही गुन्हा दाखल करण्यास साखरखेर्डा पोलीस टाळाटाळ करत असल्याचा …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मुलीच्‍या लग्‍नासाठी सव्वा लाख रुपये घेतले खरे, पण त्‍यापोटी अवैध सावकाराने वृद्धाची तब्‍बल सव्वा तीन कोटी रुपयांची मालमत्ता हडपली. जिल्हा उपनिबंधकांकडे याप्रकरणी तक्रार करण्यात आल्यानंतर त्‍यांनी चौकशी करून साखरखेर्डा पोलिसांना या अवैध सावकाराविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्याचे आदेश दिले. मात्र 15 दिवस उलटूनही गुन्‍हा दाखल करण्यास साखरखेर्डा पोलीस टाळाटाळ करत असल्याचा आरोप तक्रारदार कुटुंबाने केला आहे. विशेष म्‍हणजे यातील बरीचशी मालमत्ता सावकाराने परस्पर विकली आहे. त्‍यामुळे हा व्यवहारही जिल्हा उपनिबंधकांनी अवैध ठरवला आहे. त्‍यामुळे सावकाराकडून मालमत्ता घेणाऱ्यांनाही मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागणार आहे.

बबन नारायणराव लोंढे (45, रा. साखरखेर्डा) असे या अवैध सावकाराचे नाव आहे. त्‍यांच्‍याविरुद्ध अवैध सावकारीचा आरोप करत जमनाप्रसाद भगवतीप्रसाद तिवारी (88, रा. साखरखेर्डा) यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली होती. तिवारी यांनी मुलीच्या लग्नासाठी 2003 मध्ये लोंढे यांच्याकडून 1 लाख 25 हजार रुपये घेतले होते. त्यापोटी त्यांनी मालकीचा एक मोठा भूखंड लोंढे यांच्‍याकडे गहाण ठेवला होता. त्‍यानंतरही लोंढे यांनी पुन्हा तिवारी यांच्‍याकडून आणखी 10 प्लॉट 50 रुपयांच्या स्टॅम्पवर गहाण ठेवून घेतल्याचे तक्रारीत म्‍हटले आहे. लोंढे यांनी ते 10 प्लॉट परस्पर विकले.

तिवारी यांनी लोढेंकडून घेतलेली रक्कम देऊ केल्यानंतरही त्यांना त्यांची मालमत्ता परत मिळाली नाही. लोंढे यांनी तिवारी यांची मालमत्ता बोगस खरेदी करून बँकेला गहाण दिली होती. जिल्हा निबंधकांच्या 1 जूनच्या आदेशाने लोंढे यांनी केलेली खरेदीसुद्धा रद्द ठरवण्यात आली आहे. तसेच साखरखेर्डा पोलिसांना याप्रकरणी सावकारी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र आदेश मिळून 15 दिवस उलटूनही पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नसल्याने तक्रारदार तिवारी कुटूंबियानी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्‍यान, वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर श्री. लोंढे यांनी बुलडाणा लाइव्‍हशी संपर्क करून आपली बाजू मांडली. त्‍यांच्‍या म्‍हणण्यानुसार, ही सावकारी नसून, व्यवहार आहे. त्‍यांचे प्‍लॉट विकत घेतले असल्याचे त्‍यांनी सांगितले. कोरोनामुळे जिल्हा उपनिबंधकांकडे आपण तारखेवर हजर राहू शकलो नाही. त्‍यामुळे हा निकाल आमच्‍या अपरोक्ष देण्यात आला. या प्रकरणात आम्‍ही अपील केले असून, अमरावती येथील विभागीय कार्यालयात त्‍यावर सुनावणी होणे अपेक्षित आहे, असे ते म्‍हणाले.

…अन्यथा उपोषण करू
पोलिसांनी या प्रकरणी लोंढेंविरुद्ध कारवाई न केल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा तिवारी यांनी दिला आहे.