साडेआठ हजारावर मजुरांना मिळाला गावातच रोजगार!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना प्रकोपामुळे उद्योग धंदे ठप्प आणि लॉकडाऊन, कर्फ्यूमुळे स्थानिक रोजगार नसल्याने ग्रामीण भागातील मजूर, गोरगरीब हवालदिल झालेय! अशा स्थितीत रोजगार हमी योजनांच्या कामांनी त्यांना मदतीचा हात दिला आहे. सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांवर साडे आठ हजारांवर मजूर कार्यरत असल्याचे सुखद चित्र आहे. नजीकच्या काळात हा आकडा 10 …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोना प्रकोपामुळे उद्योग धंदे ठप्प आणि लॉकडाऊन, कर्फ्यूमुळे स्थानिक रोजगार नसल्याने ग्रामीण भागातील मजूर, गोरगरीब हवालदिल झालेय! अशा स्थितीत रोजगार हमी योजनांच्या कामांनी त्यांना मदतीचा हात दिला आहे. सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांवर साडे आठ हजारांवर मजूर कार्यरत असल्याचे सुखद चित्र आहे. नजीकच्या काळात हा आकडा 10 हजाराच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या प्रतापामुळे रोजगार धंदे बुडाले असून व्यापार उदीम ठप्प झाला आहे. महानगरातील कोरोना उद्रेकामुळे जिल्ह्यातील हजारो स्थलांतरीत मजूर, अर्धकुशल कामगार आपापल्या मूळ गावी परतले आहेत. तसेच  रब्बी हंगाम जवळपास आटोपला असून शेतातील मजुरीची कामे आटोपली आहे. यामुळे हातावर पोट अवलंबून असलेल्या हजारो ग्रामीण मजुरांसाठी रोहयोची कामे वरदान व त्यांच्यासह कुटुंबासाठी तारणहार ठरली आहेत.

सध्या जिल्ह्यातील 869 पैकी 516 ग्रामपंचायत क्षेत्रात ‘रोहयो’ची विविध कामे सुरू आहे. यामध्ये सर्वाधिक कामे घरकुलाची असून, याशिवाय सिंचन विहिरी, वृक्षारोपण, रोपवाटिका, फळबाग व तुती लागवड ही कामे सुरू आहेत. या कामांवर सध्या 8 हजार  693 मजूर आहेत. खामगावमध्ये सर्वाधिक म्हणजे 1433 मजुरांना रोजगार मिळाला आहे. याखालोखाल मेहकर 1106, मोताळा 1048, चिखली 969, जळगाव जामोद 765 , नांदुरा 715, संग्रामपूर 662, लोणार 522 अशी कामांवरील मजुरांची संख्या आहे. मात्र इतर तालुक्यांत कामाची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे.

38 कोटी खर्ची

दरम्यान, कोरोना प्रकोपामध्येही चालू आर्थिक वर्षात रोहयोच्या कामावर आज अखेर 37 कोटी 88 लाख रुपये खर्च झाले आहेत. अकुशल कामावर 30 कोटी 41 लाख तर कुशल कामावर 4 कोटी 36 लाख खर्च झाले आहेत.