साला! एक कन्व्हर्टर ऑक्सिजन को निकम्मा बना देता है!! आरोग्य यंत्रणेची खंत

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अष्टपैलू अभिनेता असलेल्या नाना पाटेकरची अदा, अभिनय व संवादशैली सगळंच हटके असते. त्यांच्या एका चित्रपटातील एक सुपर हिट डायलॉग म्हणजे ‘ साला, एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है’ याच धर्तीवर निराशेचा पण वेगळा असा ‘साला एक कन्व्हर्टर न होना ऑक्सिजन को निकम्मा बना देता है’, …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अष्टपैलू अभिनेता असलेल्या नाना पाटेकरची अदा, अभिनय व संवादशैली सगळंच हटके असते. त्यांच्या एका चित्रपटातील एक सुपर हिट डायलॉग म्हणजे ‘ साला, एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है’ याच धर्तीवर निराशेचा पण वेगळा असा ‘साला एक कन्व्हर्टर  न होना ऑक्सिजन को निकम्मा बना देता है’, असा संवाद म्हणण्याची वेळ प्रशासन व आरोग्य यंत्रणेवर आली आहे. एवढेच नव्हे तर शेजारच्या तीन-तीन जिल्ह्यांची वेळोवेळी याचना करण्याची पाळी सुद्धा त्यांच्यावर आली आहे.

कोरोनाचा भीषण प्रकोप असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात अधूनमधून ऑक्सिजनचा तुटवडा  निर्माण होतो. हल्ली हे ऑक्सिजन पुराण भलतेच गाजतेय. आता त्यात नाना पाटेकर अन्‌ कन्व्हर्टरचा  काय  संबंध ? असा कुणाचा प्रश्न असेल तर नानाचा नाही पण त्यांच्या संवादासारखी परिस्थिती निश्चितच निर्माण झाली असून कन्व्हर्टरचा तर  अनिवार्य संबंध आहे. आजवर कधी चर्चेत न आलेला हा विषय एका तज्‍ज्ञासोबत केलेल्या अनौपचारिक चर्चेत पुढे आला.  एक कोरोना विरुद्धच्या लढ्यात जिल्ह्याला जो ऑक्सिजन मिळतो तो लिक्विड अर्थात द्रव्य स्वरूपात मिळतो. कार्यपद्धतीनुसार तो कोविड वा अन्य रुग्णालयांत आढळून येणाऱ्या मोठ्या आकाराच्या (जम्बो) सिलिंडरमध्ये नव्याने भरावा लागतो. यासाठी अत्यावश्यक असलेले कन्व्हर्टर बुलडाणा शहरच काय अख्ख्या जिल्ह्यात उपलब्ध नाय! यामुळे कधी 4, कधी 8 टन अशा प्रमाणात येणारा हा ऑक्सिजन जम्बो सिलिंडरमध्ये भरणे अशक्य ठरते. हा द्रव्य प्राणवायू  सिलिंडरमध्ये भरणारे कन्व्हर्टर शेजारील 3 जिल्ह्यांत उपलब्ध आहेत. यामुळे कन्व्हर्टर नसल्याने आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासनवर ही विचित्र स्थिती ‘साला एक कन्व्हर्टर ऑक्सिजन को निकम्मा बना देता है’ असे म्हणण्याची पाळी आणते. तसेच यंत्रणांना जालना, अकोला किंवा जळगाव (खानदेश) या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना लोणी लावण्याची वा मदतीची याचना करण्याची पाळी येते, ही झाली निगेटीव्ह बातमी.

आता पॉझिटिव्ह बातमी

निराश किंवा चिंताग्रस्त न होता आता 2 पॉझिटिव्ह (म्हणजे पॉझिटिव्हची नव्हे तर सकारात्मक ) बातम्या आहेत.  यंत्रणांची प्रचंड अडचण करणारी ही कन्व्हर्टरची अडचण लवकरच दूर होणार आहे. येत्या काही दिवसांतच जिल्ह्याला कन्व्हर्टरचा पुरवठा होणार आहे. दुसरे म्हणजे जिल्ह्यासाठी नियमित 10 मेट्रिक टन ऑक्सिजनचा कोटा मंजूर झाला आहे. राज्यस्तरीय कृती आराखड्यात याचा समावेश असून येत्या काही दिवसांतच जिल्ह्याला रोज 10 मेट्रिक टन प्राणवायूचा पुरवठा होण्याची दाट शक्यता आहे.