सिंदखेडराजा ः पंचायत समितीचा कनिष्ठ अभियंता लाचेच्‍या जाळ्यात!; 40 हजार घेताना रंगेहात पकडला

बुलडाणा (कृष्णा सपकाळः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बांधकामाच्या बिलाची रक्कम देण्यासाठी 70 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणारा सिंदखेड राजा पंचायत समितीचा कनिष्ठ अभियंता चाळीस हजार रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अलगद अडकला. पंचायत समितीच्या आवारात ही कारवाई 23 मार्चला सायंकाळी करण्यात आली. संदीप सुरेश उबाळे (34, रा. धामणगाव बढे, ह.मु. सिंदखेड राजा) असे …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बांधकामाच्या बिलाची रक्कम देण्यासाठी 70 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणारा सिंदखेड राजा पंचायत समितीचा कनिष्ठ अभियंता चाळीस हजार रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्‍या (एसीबी) जाळ्यात अलगद अडकला. पंचायत समितीच्या आवारात ही कारवाई 23 मार्चला सायंकाळी करण्यात आली.

संदीप सुरेश उबाळे (34, रा. धामणगाव बढे, ह.मु. सिंदखेड राजा) असे या लाचखोराचे नाव आहे. तो सिंदखेड राजा पंचायत समितीत  कनिष्ठ अभियंता (वर्ग 3)या पदावर कार्यरत आहे. दुसरबीड येथील 55 वर्षीय शासकीय बांधकाम कंत्राटदाराने  वाकद, राहेरी व आडगाव राजा येथील जिल्हा परिषद शाळेच्या खोल्यांचे बांधकाम केले होते. त्यांचे एकूण बिल 25,26,000 रुपये त्यांना घेणे होते. बिल देण्यासाठी कनिष्ठ अभियंता उबाळेने सत्तर हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी ‘एसीबी’कडे तक्रार केली.   तक्रारीची शहनिशा केल्यानंतर खात्री पटल्‍याने ‘एसीबी’ने पंचायत समिती आवारात सापळा रचला.  यावेळी उबाळे याला 40,000 रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई  लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलडाणाचे पोलीस उपअधीक्षक संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलडाणाचे पोलीस उपअधीक्षक आर. एन. मळघणे, पोलीस नाईक विलास साखरे, रवींद्र दळवी, पोलीस शिपाई जगदीश पवार यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

कुणी लाच मागत असल्यास…

कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी शासकीय अधिकारी वा त्याच्या वतीने एखाद्या खासगी व्‍यक्‍तीने लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.

  • संपर्क क्रमांक-8888768218
  • टोल फ्री क्रमांक-1064