सिंदखेड राजात श्रीराम ॲग्रो एजन्सीला आग; लाखोंचे नुकसान

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सिंदखेड राजा येथील श्रीराम ॲग्रो एजन्सीच्या गोदामाला आज, ११ सप्टेंबरला पहाटे आग लागली. आगीत लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला आहे. शहरातील महालक्ष्मी रेसिडेन्सी येथे दिलीप चौधरी यांचे कृषी साहित्य व इलेक्ट्रिक बाईकचे दुकान आहे. पहाटे तीनच्या सुमारास दुकानामागील असलेल्या गोडावूनला भीषण आग लागली. गोडावूनमध्ये ठिबक …
 
सिंदखेड राजात श्रीराम ॲग्रो एजन्सीला आग; लाखोंचे नुकसान

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सिंदखेड राजा येथील श्रीराम ॲग्रो एजन्सीच्या गोदामाला आज, ११ सप्‍टेंबरला पहाटे आग लागली. आगीत लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला आहे.

शहरातील महालक्ष्मी रेसिडेन्सी येथे दिलीप चौधरी यांचे कृषी साहित्य व इलेक्‍ट्रिक बाईकचे दुकान आहे. पहाटे तीनच्‍या सुमारास दुकानामागील असलेल्या गोडावूनला भीषण आग लागली. गोडावूनमध्ये ठिबक व तुषार सिंचन संच, कृषी पाईप, विविध कृषी साधने त्याचबरोबर इलेक्‍ट्रिक मोटारसायकलीचा साठा ठेवलेला होता. शॉकसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र आगीत चौधरी यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. गोडावूनमधील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले.

याच गोडावूनवर समृध्दी महामार्गाचे कार्यालय असून, आगीत कार्यालयाचेही मोठे नुकसान झाले आहे. आग लागल्याची माहिती गस्तीवर असलेल्या गोरखांनी नागरिकांना दिली. त्यानंतर दिलीप चौधरी घटनास्थळी दाखल झाले. चार खासगी पाणी टँकर बोलावून आग विझविण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान जालना येथील अग्‍निशमन दलाला पाचारण करण्यात आले. पहाटे पाच वाजता जालना येथून फायरबंब घटनास्थळी पोहोचेपर्यंत संपूर्ण साहीत्याची राख झाली होती. माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी तहसीलदार सुनिल सावंत, पोलीस निरिक्षक केशव वाघ, नियोजन मंडळाचे सदस्य ॲड. नाझेर काझी, माजी नगराध्यक्ष देविदास ठाकरे, माजी नगराध्यक्ष विष्णू मेहेत्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

जालन्यातून अग्‍निशमन दल काम मागवावे लागले?
शहरात आगीच्या घटना तशा तुरळकच. मात्र नगरपालिका असल्याने पालिका आयुध म्हणून अग्निशमन सुविधा प्रत्येक नगरपालिकेला दिली जाते. तशी सुविधा सिंदखेड राजा पालिकेतही आहे. मात्र तरीही जालना येथून फायरबंब का मागावे लागले, असा प्रश्न आता उपस्‍थित केला जात आहे. दोन वर्षांपासून अग्निशमनची गाडी पालिका परिसरात उभी आहे.

…तर हे नुकसान टळले असते!
पालिकेला मिळालेले अग्निशमन वाहन आतापर्यंत कार्यान्वित केले गेले असते तर आज लागलेल्या आगीत झालेले लाखोंचे नुकसान टळले असते, अशी प्रतिक्रीया भाजप नेते विष्णू मेहेत्रे यांनी दिली आहे.