सुपारी बहाद्दर पोलिसांच्‍या अडकित्त्यात!; शेगावच्‍या लॅब चालकावर केला होता हल्ला

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तुझी सुपारी घेतल्याचे सांगून खासगी लॅबचालकावर हल्ला करून लुटणाऱ्यास अखेर पकडण्यात यश आले आहे. शेगाव शहर पोलिसांनी त्याला अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यातून शेगावमध्ये आणले आहे. त्याच्याकडून शेगावमध्ये घडलेल्या आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. मंगेश चिंतामण देवकर (रा. शिवाजीनगर, शेगाव) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः तुझी सुपारी घेतल्याचे सांगून खासगी लॅबचालकावर हल्ला करून लुटणाऱ्यास अखेर पकडण्यात यश आले आहे. शेगाव शहर पोलिसांनी त्‍याला अकोला स्‍थानिक गुन्‍हे शाखेच्‍या ताब्‍यातून शेगावमध्ये आणले आहे. त्‍याच्‍याकडून शेगावमध्ये घडलेल्या आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्‍यता आहे.

मंगेश चिंतामण देवकर (रा. शिवाजीनगर, शेगाव) असे अटक केलेल्या गुन्‍हेगाराचे नाव आहे. श्रीकृष्ण त्र्यंबक घोगले या खासगी लॅबचालकाला त्‍याने साथीदारासह मिळून लुटले होते. २१ जूनला रात्री पावणेनऊच्‍या सुमारास बाळापूर रोडवरील शेतात असताना ही लुटमार व हल्ला घोगले यांच्‍यावर झाला होता. त्‍यांच्‍या डोक्‍यात दगड घालून पँटच्‍या खिशातील १० हजार रुपये काढून हल्लेखोरांनी पळ काढला होता. या प्रकरण शेगाव शहर पोलिसांनी गुन्‍हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. मंगेश हा अकोल्यात संशयास्पदरित्‍या फिरताना खदान (अकोला) पोलिसांनी ताब्‍यात घेतला होता. त्‍याला अकोला स्‍थानिक गुन्‍हे शाखेने तपासकामी ताब्‍यात घेतले होते.

घोगले यांच्‍यावर हल्ला करणाराही त्‍याच वर्णनाचा असल्याने पोलीस उपनिरिक्षक नितीनकुमार इंगोले, पो.ना. श्री. वाकेकर, श्री. बोरसे यांचे पथक ठाणेदार संतोष ताले यांच्‍या आदेशाने अकोला येथे गेले. त्‍यांनी मंगेशची चौकशी केली असता त्‍याने घोगले यांच्‍यावर हल्ला केल्याचे कबूल केले. साथीदार महेश करोडदे (रा. अंबासी) याच्‍यासोबत मिळून त्‍याने हा गुन्‍हा केला होता. मंगेशला ताब्‍यात घेऊन पोलीस शेगावला परतले. त्‍याला न्यायालयात हजर केले असता ७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. त्‍याच्‍या चौकशीतून आणखी काही गुन्हे समोर येऊ शकतात, अशी शक्‍यता आहे. ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, उपविभागीय अधिकारी अमोल कोळी यांच्‍या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरिक्षक संतोष ताले यांच्‍या नेतृत्त्वात पोलीस उपनिरिक्षक योगेशकुमार दंदे, पोलीस उपनिरिक्षक नितीनकुमार इंगोले, एएसआय लक्ष्मण मिरगे, पो.ना. गणेश वाकेकर, पो. ना. राहुल पांडे, पो. ना. उमेश बोरसे, पो.काँ. विजय साळवे, पो. काँ. बारवाल यांनी केली.