सुलभ हप्‍त्‍याने भव्य फसवणूक योजना… देऊळगाव राजात कोट्यवधीचा प्‍लॉटिंग घोटाळा!; चौघांवर आरोप, एका राजकीय नेत्‍याचा समावेश

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देऊळगाव राजा तालुक्यात कोट्यवधी रुपयांचा प्लॉटिंग घोटाळा समोर आला आहे. फसवले गेल्याचे लक्षात आल्यानंतर शेंदुर्जनच्या डॉक्टरांनी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, दीड लाख रुपयांनी गंडा घालण्याचे आल्याचे त्यांनी म्हटले आहे. अशाच प्रकारे गावातीलच आणखी तिघांची लाखो रुपयांनी फसवणूक झाली असून, गिरोली रोड, देऊळगाव राजा असा पत्ता दाखवून जाहीर केलेल्या …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः देऊळगाव राजा तालुक्‍यात कोट्यवधी रुपयांचा प्‍लॉटिंग घोटाळा समोर आला आहे. फसवले गेल्याचे लक्षात आल्यानंतर शेंदुर्जनच्या डॉक्‍टरांनी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, दीड लाख रुपयांनी गंडा घालण्याचे आल्याचे त्‍यांनी म्‍हटले आहे. अशाच प्रकारे गावातीलच आणखी तिघांची लाखो रुपयांनी फसवणूक झाली असून, गिरोली रोड, देऊळगाव राजा असा पत्ता दाखवून जाहीर केलेल्या ‘सुलभ हप्‍त्‍याने भव्य प्‍लॉटिंग योजने’त बरेच जण फसवले गेल्याची शक्‍यता आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्‍हे शाखेने केल्यास कोट्यवधींचा हा घोटाळा समोर येऊ शकतो. विशेष म्‍हणजे, डॉक्‍टरांनी तक्रारीत ज्‍या चौघांची नावे घेतली आहेत, त्‍यात एक राजकीय नेताही आहे. त्‍यामुळे या प्रकरणाचा तपास दीड महिन्यापासून ‘सुरूच’ असल्याची चर्चा आहे. ज्‍या जमिनीवर प्‍लॉटिंग पाडली, ती या चौघांच्या नावावर नाही, मुळात तिथे कोणती प्‍लॉटिंगच नसल्याचे तक्रारकर्त्यांचे म्‍हणणे आहे.

शेंदुर्जन (ता. सिंदखेड राजा) येथील डॉ. प्रदीप सीताराम नागरे यांनी 22 एप्रिल 2021 रोजी साखरखेर्डा पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार बिबी येथील एका विद्यालयातील कारकूनाने 2013 मध्ये नागरे यांना भेटून प्लॉटिंगची योजना सांगितली. त्‍याने सांगितल्यानुसार गिरोली रोड देऊळगाव राजा येथे चौघांनी सुलभ हप्त्याने प्लॉटिंगची योजना सुरू केली होती. येथे प्रत्येकी 900 चौरस फुटांचे प्लॉट पाडल्याचे व त्याचा भाव 255 रुपये चौरस फूट असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी 40 हप्‍त्‍यांमध्ये रक्कम भरायची असल्याचे सांगितले. डॉ. नागरे हे प्लॉट पाहण्यासाठी गिरोली रोड देऊळगाव राजा येथे गेले असता त्यांना नकाशा दाखवत त्‍यांच्‍याकडून 3500 रुपये बुकिंग फी आकारण्यात आली. मात्र प्लॉट दाखवण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यानंतर डॉ. नागरे यांनी 30 हप्‍त्‍यांची रक्कम भरली. बुकिंग फी आणि हप्‍त्‍यांची रक्‍कम असे 1 लाख 53 हजार रुपये त्‍यांनी भरले. त्याच्या पावत्याही त्यांना देण्यात आल्या होत्या. दरम्यानच्या कालावधीत डॉ. नागरे यांनी प्लॉट दाखवा असे वारंवार म्हटले असता तुम्ही अगदी निश्चिंत राहा. तुम्हाला तुमचा प्लॉट मिळेल, असे सांगण्यात येते होते. डॉ. नागरे यांच्यासोबतच शेंदुर्जन येथील रामदास अश्रूबा सानप, महेश तोताराम शिंगणे, अश्रूबा सानप, एकनाथ शिंगणे यांनीही रक्कम भरल्‍याचे तक्रारीत म्‍हटले आहे.

शंकेची पाल चुकचुकली…
21 एप्रिल 2021 रोजी डॉ. नागरे यांनी पुन्हा फोन करून प्लॉटबद्दल विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्‍यामुळे त्‍यांच्‍या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्‍यामुळे त्‍यांनी महसूल अभिलेखात पडताळणी केली असता प्लॉट देणाऱ्यांच्‍या नावाने कुठेही जमीन आढळली नाही. त्यामुळे नागरे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्‍यांनी तातडीने साखरखेर्डा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. शेंदुर्जन येथीलच अश्रूबा सानप यांची 2 लाख, एकनाथ शिंगणेंची 1 लाख 53 हजार, रामदास सानप यांची 1 लाख 53 हजार रुपयांनी फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पैसे घेऊन प्लॉट न देता फसवणूक केल्याप्रकरणी उगले पांग्री, डावरगाव, जालना, बिबी येथील चार संशयितांसह त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी डॉ. नागरे यांनी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केली आहे.

तक्रार देऊन दीड महिना उलटला; तरी गुन्हे दाखल नाहीत…
फसवणुकीच्या या प्रकाराची तक्रार देऊन दीड महिना उलटला असला तर अद्याप याप्रकरणी कुणाविरुद्धही गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत. याबाबत ठाणेदार जितेंद्र अडोळे यांच्‍याशी संपर्क केला असता, हे प्रकरण चौकशीवर असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र कोट्यवधीच्‍या घोटाळ्याची व्‍याप्‍ती असलेल्या या प्रकरणाचा तपास सक्षम अधिकाऱ्याकडे देण्याऐवजी बीट जमादाराकडे देण्यात आल्याबद्दल तक्रारदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.