सेवाव्रती आदरणीय शिवशंकर भाऊ पाटील!

दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती… भारतीय अध्यात्माला सर्व संत मांदियाळीने त्यांच्या कार्याने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यातच महाराष्ट्रातील संत परंपरा ही एक महान परंपरा आहे. त्या परंपरेमध्ये संत ज्ञानेश्वरांपासून तर आजतागायत झालेल्या सर्व संतांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने, लेखणीने, प्रबोधनाने हा सगळा आसमंत शिक्षित करण्याचा, प्रकाशमान करण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे. जे जे …
 

दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती… भारतीय अध्यात्माला सर्व संत मांदियाळीने त्यांच्या कार्याने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यातच महाराष्ट्रातील संत परंपरा ही एक महान परंपरा आहे. त्या परंपरेमध्ये संत ज्ञानेश्‍वरांपासून तर आजतागायत झालेल्या सर्व संतांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने, लेखणीने, प्रबोधनाने हा सगळा आसमंत शिक्षित करण्याचा, प्रकाशमान करण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे. जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी शिकवावे… ज्ञानी करून सोडावे सकलजन… या अध्यात्म परंपरेतील काही संत हे आपल्या लेखणीने व व आपल्या वाणीने या जगाला मार्ग दाखवत होते तर काही लोक काही संत आपल्या कृतीने आपल्या अवलिया लीलांनी या जगाला सूचक मार्ग दाखवत होते. त्यामधूनच विदर्भातील शेगाव येथील संत गजानन महाराज होय. संत गजानन महाराजांच्या नावाने जे गजानन महाराज संस्थान शेगाव येथे आज कार्यरत आहे त्याचे एक सेवाव्रती म्हणून जे वयाच्या 87 वर्षी सातत्याने चोखपणे काम पाहत आहेत त्या आदरणीय शिवशंकरभाऊ पाटील यांचा 12 जानेवारी हा वाढदिवस.

आपल्या सेवेने सर्वांना जिंकून घेऊन देणगीच्या पैशातून एक आदर्श सेवाकार्य निर्माण करण्याचं काम त्यांनी उभारून भारतामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. स्वच्छता चोख नम्र व्यवहार आणि अध्यात्माची खरी ओळख ज्या ठिकाणी अनुभवायला मिळते ते म्हणजे शेगाव संस्थान होय. या संस्थांमध्ये 42 प्रकारचे सेवा कार्य व सेवा प्रकल्प राबवून शिक्षणाची सोय, आदिवासींना अन्नाची सोय, त्यांच्या मुलांना शिक्षण, वैद्यकीय मोफत सेवा, बससेवा, अभियांत्रिकी महाविद्यालय, इंग्रजी शिक्षणाची व शिक्षणाची उच्च प्रतीची सुविधा या प्रकारच्या कार्यातून भाऊंनी शेगावच्या पंचक्रोशीमध्ये निर्माण केलेले आहे. जो कोणी भक्त आपल्या गावाहून शेगावला महाराजांच्या दर्शनासाठी येतो. त्यांच्या जेवणाची मोफत व्यवस्था व त्याच्या राहण्याची अत्यल्प दरामध्ये व्यवस्थाही शेगावला पाहायला मिळते. जेव्हा परदेशातील लोक या मंदिराला भेट देतात तेव्हा ते विचार करतात की एवढ्या कमी पैशांमध्ये इतका चोख आणि स्वच्छ सुसज्ज कारभार कसा चालतो? याचे त्यांना आश्‍चर्य वाटते. जेव्हा माननीय शरद पवार साहेब शेगावच्या संस्थांना भेट देतात व आनंद विहारला निवास करतात. तेव्हा ते आपलं मत व्यक्त करताना म्हणतात की मी सर्व जगभरामध्ये फिरलो; पण शेगाव संस्थान सारखीच शिस्त, स्वच्छता व चोख कारभार मला कुठेच पाहायला मिळाला नाही. एका जाणत्या व्यक्तीने व्यक्त केलेले हे मत अतिशय महत्त्वाचं याठिकाणी वाटते. कोविड कालावधीमध्ये येथे पाहिलेली शिस्त, बंदी संस्थांमध्ये निर्माण केलेली नवी व्यवस्था आणि कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर घेतलेली खबरदारी. हे कार्य तर जगभरामध्ये सर्वांनी आदर्श घ्यावा इतपत मोठ्या उंचीचे आहे. भारतीय संत परंपरांमध्ये जे अवलिया कोटीतील संत आहेत या संतांनी ज्या लीला केल्या त्या लीलांना लोकांच्या समोर आणून आपल्या जीवनातील काही उणीवा असतील तर त्या नीती मार्गाने पूर्ण होऊ शकतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे… संत तुकारामांच्या वचनानुसार संतांनी या भुतलावर जगाचे कल्याण करण्या करिता अवतारकार्य धारण केले आहे. आपण आपल्या कार्यामध्ये जर नीतिमान असू तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये नेहमी सन्मार्ग सापडतो असा अनुभव संत गजानन महाराजांच्या सर्व लीलांवरून आपल्याला अनुभवायला मिळतो. मी गेले असे म्हणू नका मी आहे येथेच ….! अशी अनुभूती आजही भक्तांना देत राहून भक्तांचे कार्य आपले कार्य समजून त्यांना आत्मदर्शन देण्याचे काम आजही संत गजानन महाराज करतात. शिवशंकर भाऊंच्या दूरदृष्टीमुळे आजही संस्थांमध्ये दिवसागणिक विकास कार्य भक्तांच्या सोयीसाठी सुविधा सातत्याने सुरू आहेत. त्यांची विचार प्रगल्भता व त्यांनी केलेला मानव हिताचा विचार हा सर्वांसाठी एक आदर्श आहे.

– प्रा. डॉ. हरिदास आखरे,

श्रीमती कोकीळाबाई गावंडे महिला महाविद्यालय दर्यापूर, जिल्हा अमरावती मो.7588566400