सैलानी बाबा यात्रेच्या संदलमध्ये सुरक्षित अंतराचा फज्जा! हजारोंचा जमाव, पोलिसांचा सौम्य छडीमार; हजारांवर व्यक्‍तींविरुद्ध होणार गुन्हे दाखल

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः तालुक्यातील सैलानी येथे हाजी हजरत अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा दरगाह परिसरात भरणारी महायात्रा यंदाही रद्द करण्यात आली होती. मात्र काल, 2 एप्रिलला संध्याकाळी निघणाऱ्या संदल प्रसंगी अकस्मात हजारोंचा जमाव गोळा झाल्याने सुरक्षित अंतराच्या नियमाचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. यामुळे पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून जमावाला पांगवले. दुसरीकडे आज, 3 एप्रिलला …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः तालुक्यातील सैलानी येथे हाजी हजरत अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा दरगाह परिसरात भरणारी महायात्रा यंदाही रद्द करण्यात आली होती. मात्र काल, 2 एप्रिलला संध्याकाळी  निघणाऱ्या संदल प्रसंगी अकस्मात हजारोंचा जमाव गोळा झाल्याने सुरक्षित अंतराच्‍या नियमाचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. यामुळे पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून जमावाला पांगवले. दुसरीकडे आज, 3 एप्रिलला निर्देशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 1 हजारांवर व्यक्‍तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया कारवाई सुरू करण्यात आली. तसेच बेकायदा जमाव जमा करण्यास कारणीभूत 10 ते 12 जणांविरुद्ध नावानिशी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तहसीलदार रुपेश खंडारे यांनी आज, 3 एप्रिलला प्रसार माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

होळीच्या सणापासून सैलानी यात्रेला सुरुवात होते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी ही यात्रा रद्द करण्यात आली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने सैलानीतील सर्व कार्यक्रम रद्द करत मोजक्याच नागरिकांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम पार पाडावे, असे निर्देश दिले  होते. काल 2 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता 114 वा संदल साध्या पध्दतीने चढवण्यात आला.

जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या आदेशाने यापूर्वीच सैलानी बाबाची यात्रा या वर्षी रद्द करण्यात आली होती. त्यानुसार सैलानी दर्गा परिसरात पाच जणांच्या उपस्‍थितीत पाच नारळांची होळी पेटवून महोत्सवाला सुरुवात करण्यात आली. यानंतर पाच दिवसांनी हाजी हजरत अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांच्या दर्गावर फुलांची चादर चढवण्यात येते. यात्रेच्या अंतिम टप्प्यात निघणाऱ्या संदलची परंपरा खंडीत होऊ नये यासाठी सैलानी बाबा ट्रस्टचे सदस्य जावेद शेख, संतोष वानखेडे यांच्‍यासह  हाजी मो. हाशम मुजावर, शफीक मुजावर, शेख रफीक मुजावर, शेख चांद मुजावर यांच्या उपस्थितीत सैलानी बाबा यांच्या 114 व्या संदल शरिफ सैलानी बाबा यांच्या मजारवर फुलांची चादर चढवण्यात आली.

जिल्हा प्रशासनाने सैलानीकडे येणाऱ्या सर्व मार्गांवर बॅरिकेट लावले होते. पोलिसांचा  तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. एवढा बंदोबस्त असतानाही काल 2 रात्री कमीअधिक तिन हजार नागरिक याठिकाणी हजर झाले. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केल्याची माहिती मिळाली.