सोयाबीन कापणीच्या दिवसांत पावसाचा धुमाकूळ; पावसाचा मुक्काम वाढणार असल्याने शेतकऱ्यांच्‍या डोळ्यांत पाणी!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पेरणीच्या सुरुवातीला रुसलेला पाऊस खरीप हंगामाच्या शेवटी मात्र दमदार कोसळत आहे. ऑगस्टच्या शेवटपर्यंत जेमतेम असलेल्या पावसाने सप्टेंबरमध्ये जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. जिल्ह्यातील सर्वाधिक लागवड झालेल्या सोयाबीनचे कापणीचे दिवस जवळ आले असताना पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतित आहेत. काल, २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी मोताळा आणि …
 
सोयाबीन कापणीच्या दिवसांत पावसाचा धुमाकूळ; पावसाचा मुक्काम वाढणार असल्याने शेतकऱ्यांच्‍या डोळ्यांत पाणी!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पेरणीच्या सुरुवातीला रुसलेला पाऊस खरीप हंगामाच्या शेवटी मात्र दमदार कोसळत आहे. ऑगस्टच्या शेवटपर्यंत जेमतेम असलेल्या पावसाने सप्टेंबरमध्ये जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. जिल्ह्यातील सर्वाधिक लागवड झालेल्या सोयाबीनचे कापणीचे दिवस जवळ आले असताना पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतित आहेत. काल, २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी मोताळा आणि नांदुरा तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले.

चिखली, मेहकर, सिंदखेड राजा आणि लोणार या भागातील पेरण्या लवकर झाल्या असल्याने काही ठिकाणी सोयाबीन कापणीला सुरुवात झाली आहे. मात्र ऐन कापणीवेळी पुन्हा पाऊस कोसळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आणखी काही दिवस पाऊस कोसळण्याची श्यक्यता आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तविलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात आज २६ सप्टेंबर ते २८ सप्टेंबरपर्यंत सार्वत्रिक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार आहे.

उद्या, २७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. २६ ते २८ सप्टेंबर दरम्‍यान मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट होण्याचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. सार्वत्रिक पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी कापणी केलेला शेतमाल ताबडतोब सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा किंवा ताडपत्रीने झाकून ठेवावा. विजांचा गडगडाट होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने स्वतःची व जनावरांची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्राचे मनीष येडुलवार यांनी केले आहे.