“स्टे’च्या धामधुमीत लागली निवडणूक! धाड सरपंचपदाची २७ सप्‍टेंबरला निवड!! निवडणुकीवर “स्टे’ साठी वेगवान हालचाली

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः न्यायालयीन स्थगितीच्या धामधुमीत बुलडाणा तालुक्यातील धाडच्या सरपंचपदाची निवडणूक लागली आहे. येत्या २७ सप्टेंबरला ही निवडणूक होणार असून, ती सध्यातरी बिनविरोध होणार आहे. दुसरीकडे या निवडणूक कार्यक्रमावर स्थगिती आणण्यासाठी वेगवान हालचाली सुरू झाल्या असल्याने ही निवड स्टेच्या सावटाखालीच पार पडणार असल्याचे चित्र आहे. यापूर्वी नाट्यमय घडामोडी घडल्या. उच्च …
 
“स्टे’च्या धामधुमीत लागली निवडणूक! धाड सरपंचपदाची २७ सप्‍टेंबरला निवड!! निवडणुकीवर “स्टे’ साठी वेगवान हालचाली

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः न्यायालयीन स्थगितीच्या धामधुमीत बुलडाणा तालुक्यातील धाडच्‍या सरपंचपदाची निवडणूक लागली आहे. येत्या २७ सप्टेंबरला ही निवडणूक होणार असून, ती सध्यातरी बिनविरोध होणार आहे. दुसरीकडे या निवडणूक कार्यक्रमावर स्थगिती आणण्यासाठी वेगवान हालचाली सुरू झाल्या असल्याने ही निवड स्टेच्या सावटाखालीच पार पडणार असल्याचे चित्र आहे.

यापूर्वी नाट्यमय घडामोडी घडल्या. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने धाडच्या कारवाईग्रस्त सरपंच खातूनबी सय्यद गफ्फार यांच्या विरुद्ध फौजदारी कारवाई करण्यास २४ नोव्हेंबर २०२१ पर्यंत स्थगिती दिली. यामुळे त्यांच्यासह त्यांच्या समर्थकांना सव्वा दोन महिन्यांपुरता का होईना दिलासा मिळाला आहे. प्रभाग ४ मधून खुल्या प्रवर्गातून सदस्यपदी निवडून आलेल्या खातूनबी यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये पार पडलेल्या धाड सरपंचपदाच्या निवडणुकीत अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र सादर केले होते. बहुमतामुळे त्या सरपंचपदी विराजमान झाल्या.

मात्र फेब्रुवारी महिन्यात ऑनलाइन पद्धतीने सादर केलेल्या महार जातीच्या प्रमाण पत्रावर जालना येथील जात पडताळणी समितीने प्रश्न उपस्थित करीत त्यांची सरपंचपदी झालेली निवड निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करावी, तसेच जालना एसडीओंना त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. दरम्यान या निर्णयाला आव्हान देत खातूनबी यांनी ॲड. एस. एस. ठोंबरे यांच्यामार्फत नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा व एस. व्ही. गंगापूरवाला यांच्या समक्ष प्राथमिक सुनावणी व युक्तिवाद पार पडला. याप्रकरणी न्यायाधीशांनी २४ नोव्हेंबरपर्यंत फौजदारी कारवाई करण्यास “स्टे’ दिला.

सावित्री बोर्डे यांनाच संधी…
दरम्यान, यामुळे जिल्हा प्रशासनासह यंत्रणा अडचणीत आल्या. सरपंच पदाच्या रिक्त पदासाठी निवडणूक लावण्यावर सखोल विचारमंथन करण्यात आले. त्यानंतर कायदेशीर मत घेण्यात आले. यानंतर आता नव्याने निवडणुकीचा मुहूर्त जाहीर करण्यात आला. कारवाईग्रस्त सरपंच खातूनबी यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे सरपंच पद रिक्त झाल्याने २७ सप्टेंबर रोजी निवडणूक घेण्यात येत असल्याचे निवडणूक विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केले. यासाठी आयोजित विशेष सभेचे अध्यासी अधिकारी म्हणून बुलडाणा तहसीलदार रुपेश खंडारे यांची जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी नियुक्ती केली आहे. दरम्यान पद अनुसूचित जाती करिता आरक्षित असून या प्रवर्गातील सावित्री सत्यवान बोर्डे या एकमेव सदस्य असल्याने (निवडणूक झाली तर) त्यांची अविरोध निवड होणार हे उघड आहे. मात्र उपसरपंचपदी कुणाची वर्णी लागते हे अजून गुलदस्त्यात आहे. मात्र खातूनबी समर्थक “स्टे’साठी उप राजधानीत पोहोचल्याने गुंतागुंत वाढली आहे.