स्मशानभूमीतून अस्‍थीसह राख चोरीला!; सोनोने कुटुंब हादरले, अफवांचा बाजार पेटण्याआधीच समोर आले खरे कारण!, बुलडाणा शहरातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातील त्रिशरण चौकातील संगम तलावाजवळील स्मशानभूमीतून अंत्यविधीनंतर अस्थी राखेसह गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार आज, ५ ऑक्टोबरला दुपारी १२ च्या सुमारास समोर आल्याने एकच कुटुंबिय आणि नातेवाइकांत एकच खळबळ उडाली. संध्याकाळी पाचपासून सार्वपित्री अमावस्या लागणार असल्याने कुणी जादूटोना करण्यासाठी तर हा प्रकार केला नाही ना, अशी चर्चा या ठिकाणी सुरू …
 
स्मशानभूमीतून अस्‍थीसह राख चोरीला!; सोनोने कुटुंब हादरले, अफवांचा बाजार पेटण्याआधीच समोर आले खरे कारण!, बुलडाणा शहरातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातील त्रिशरण चौकातील संगम तलावाजवळील स्मशानभूमीतून अंत्‍यविधीनंतर अस्‍थी राखेसह गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार आज, ५ ऑक्‍टोबरला दुपारी १२ च्‍या सुमारास समोर आल्याने एकच कुटुंबिय आणि नातेवाइकांत एकच खळबळ उडाली. संध्याकाळी पाचपासून सार्वपित्री अमावस्या लागणार असल्याने कुणी जादूटोना करण्यासाठी तर हा प्रकार केला नाही ना, अशी चर्चा या ठिकाणी सुरू होती. मात्र पोलीस तपासात याप्रकरणाचे सत्य उजेडात आले. एकाच जागेवर दोन जणांचा अत्यंविधी झाल्याने आधी अंत्यविधी उरकलेल्यांनी अस्‍थी आणि राख नेल्याची माहिती समोर येत आहे.

बुलडाणा शहरातील टिळकवाडीत राहणारे व जिल्हा व सत्र न्यायालयात सहायक अधीक्षक म्हणून नोकरी करणारे संतोष भास्कर सोनोने यांच्या पत्नी संगीता सोनुने (४८) यांचे काल, ४ ऑक्टोबरला अकोल्‍यात स्वादुपिंडाच्‍या आजाराने निधन झाले. काल त्यांचा देह बुलडाणा येथे आणण्यात आला. नातेवाइकांच्या उपस्थितीत रात्री नऊला संगम तलाव स्मशानभूमीत अंत्यविधी पार पडला. आज संध्याकाळपासून अमावस्या सुरू होत असल्याने रिक्षा विसर्जन तिसऱ्या दिवशी न करता दुसऱ्याच दिवशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. रक्षाविसर्जनासाठी दुपारी १२ वाजता सोनोने परिवार आणि त्‍यांचे नातेवाइक स्मशानभूमीत आले. मात्र तेथील दृश्य बघून त्‍यांना धक्का बसला. चक्क अस्‍थीसह राख चोरीला गेलेली होती. त्‍यामुळे चर्चेला उधाण आले.

सार्वपित्री अमावस्या असल्याने गुप्तधन मिळविण्यासाठी, जादूटोणा करण्यासाठी किंवा अघोरी पूजा करण्यासाठी कुणीतरी राख चोरली असावी, असा संशय व्यक्त होऊ लागला. बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात संतोष सोनोने यांनी तक्रार दिल्याने पोलीसही चक्रावले. पोलिसांनी चौकशी केली असता स्मशानभूमीत जिथे सोनोने यांच्या पत्नीचा अंत्यविधी केला होता, त्याच ठिकाणी बोराखेडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले व बुलडाणा येथील सावित्रीबाई फुले नगरात राहणारे पो. काँ. हिवाळे यांच्या वडिलांवर ३ ऑक्टोबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याची माहिती समोर आली. हिवाळे परिवाराने आज सकाळी ८ वाजता स्मशानभूमीत येऊन रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम पार पाडला. त्यामुळे हिवाळे परिवाराने सोनोने यांच्या अस्थी घेऊन विसर्जन केल्याचे समोर आले आहे. मात्र जेव्हा आम्ही अंत्यविधी केला तेव्हा त्या जागेवर हिवाळे यांच्या अस्थी नसल्याचे सोनोने यांनी बुलडाणा लाइव्हला सांगितले. त्‍यामुळे या प्रकरणाचे गौडबंगाल वाढले आहे. वृत्त लिहीपर्यंत याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

स्‍मशानभूमींची सुरक्षा वाऱ्यावर…
बुलडाणा शहरातील स्मशानभूमींची सुरक्षा वाऱ्यावरच असल्याचे एकूण चित्र आहे. या ठिकाणी कुणीही फारसे येत जात नसल्याने गैरकृत्‍यही घडतात. दारूड्यांचा स्मशानभूमी जणू रात्रीचा अड्डाच बनला आहे. दारू-मटनाच्‍या पार्ट्या या ठिकाणी होतात, अशी रहिवाशांत चर्चा आहे. अंत्‍यविधीनंतर नातेवाइकांना पूर्ण मृतदेह जळेपर्यंत थांबावे लागले. अन्यथा लाकडे चोरीस जाण्याचेही प्रकार मागल्या काळात घडले आहेत.