स्वत: च्या जीवाच्या भितीने घेतला १५ फुटी अजगराचा जीव

जेसीबी चालवून, कुर्हाडीने घाव घालून केली हत्यापरभणी जिल्ह्यातील बोंदरवाडी ग्रामस्थांचे क्रौर्य परभणी : प्रत्येकालाच स्वत:चा जीव प्यारा असतो आणि स्वत:चा जीव वाचविण्यासाठी माणूस कोणत्याही थराला जातो. तो मुक्या प्राण्यांचा जीव घेण्यासही मागेपुढे पाहत नाही. परभणी जिल्ह्यात असाच एक दुर्दैवी प्रकार उघडकीस आला आहे. येथे बोंरवाडी (ता.मानवत) गावात ग्रामस्थांनी गेल्या अनेक दिवसांपासून शिवारात फिरणार्या एका १५ …
 

जेसीबी चालवून, कुर्‍हाडीने घाव घालून केली हत्या
परभणी जिल्ह्यातील बोंदरवाडी ग्रामस्थांचे क्रौर्य

परभणी : प्रत्येकालाच स्वत:चा जीव प्यारा असतो आणि स्वत:चा जीव वाचविण्यासाठी माणूस कोणत्याही थराला जातो. तो मुक्या प्राण्यांचा जीव घेण्यासही मागेपुढे पाहत नाही. परभणी जिल्ह्यात असाच एक दुर्दैवी प्रकार उघडकीस आला आहे. येथे बोंरवाडी (ता.मानवत) गावात ग्रामस्थांनी गेल्या अनेक दिवसांपासून शिवारात फिरणार्‍या एका १५ फुटी अजगराचा जीव घेतला आहे. हा अजगर आपल्याला गिळंकृत करेल या भीतीने ग्रामस्थांनी कुर्‍हाडीचे घाव घालून व अक्षरश: जेसीबीचा मोठ्या खोर्‍याचे घाव घालून अजगराचे तुकडेतुकडे केले. आता या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाल्यानंतर त्याची चौकशी होण्याची शक्यता निर्माण झाली असून आम्हाला भीती वाटत होती म्हणून आम्ही अजगराला मारल्याचा दावा ग्रामस्थ करत आहेत. बोंदरावाडी शिवारात एका शेतात १५ फुटी अजगर काही ग्रामस्थांना दिसला. हळूहळू त्याची चर्चा गावभर झाली. अजगराला पाहण्यासाठी लोक जमा झाले. काही जणांनी गंगाखेड येथील सर्पमित्रांना फोन केला. ते गावात यायला निघाले. पण त्याआधीच काही ग्रामस्थांनी त्या अजगरावर कुर्‍हाडीने घाव घालण्यास सुरुवात केली. कुर्‍हाडीने वार करून अजगराचे दोन तुकडे करण्यात आले. नंतर गावातून जेसीबी आणून त्याचे छोटेछोटे तुकडेही करण्यात आले. काही अतिउत्साही मंडळींनी अजगराचे तुकडे हातात घेऊन त्याचे फोटो काढले, व्हिडिओ शुट करून तो सोशल मीडियात शेअर केला. त्यामुळे या घटनेला वाचा फुटली आहे. अनेक प्राणीमित्रांनी या घटनेबद्दल हळहळ व्यक्त करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या १५ फुटी अजगराचे वजन ८० ते ९०किलो होते.सध्या काढणीचा हंगाम असल्याने शेतकरी गावात जाण्यास भीत होते.त्यामुळे आम्ही आमचा जीव वाचविण्यासाठी अजगराला मारले, असा दावा, ग्रामस्थांनी केला आहे.