‘स्वाभिमानी’ नेत्याच्या जन्मदिनी भादोला येथे साकारले कोरोना आयसोलेशन केंद्र ; लोकसहभागाची जिल्हाधिकाऱ्यांनी केली प्रशंसा

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नेत्यांचा वाढदिवस हा दिखाऊ कार्यक्रमांचा मोठा राजकीय इव्हेंटच असतो हा (गैर) समज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवानेते रविकांत तुपकर यांनी आज, 13 मे रोजी आपल्या जन्मदिनी साफ चुकीचा ठरवला. सकाळी चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारून व गृहस्वामिनीने केलेल्या ओवळणीनंतर कोरोना रुग्णांच्या काही समस्या मार्गी लावून त्यांनी थेट बुलडाणा- खामगाव मार्गावरील …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः नेत्यांचा वाढदिवस हा दिखाऊ कार्यक्रमांचा मोठा राजकीय इव्हेंटच असतो हा (गैर) समज  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवानेते रविकांत तुपकर यांनी आज, 13 मे रोजी आपल्या जन्मदिनी साफ चुकीचा ठरवला. सकाळी चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारून व गृहस्वामिनीने केलेल्या ओवळणीनंतर कोरोना रुग्णांच्या काही समस्या मार्गी लावून त्यांनी थेट बुलडाणा- खामगाव मार्गावरील भादोला हे गाव गाठले. किन्होळ्या पाठोपाठ तिथे लोक सहभागातून उभारलेल्या कोरोना आयसोलेशन केंद्राचे यावेळी अनौपचारिक शुभारंभ करण्यात आला.

या संकल्पनेचे भरभरून कौतुक करणारे जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या हस्ते हा छोटेखानी लोकार्पण सोहळा पार पडला. जिल्हा आरोग्य अधिकारी राजेंद्र सांगळे, वरवंडचे  वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश राठोड, सरपंच प्रमोदअप्पा वाघमारे, उपसरपंच अमीन खाँसाब, ग्रा. पं. सदस्यांसह सुरक्षित अंतरावर असलेले, शिक्षक, आरोग्य कर्मचारी आणि गावकरी या अनोख्या सोहळ्याचे साक्षीदार ठरले. प्रत्येक गावात स्वतंत्र आयसोलेशन सेंटर सुरू व्हावे, अशी संकल्पना रविकांत तुपकर यांनी मांडली आणि त्यांच्या पुढाकाराने किन्होळा येथे लोकसहभागातून जिल्ह्यातील पहिले सुविधायुक्त कोरोना आयसोलेशन सेंटर सुरू झाले.  याच धर्तीवर बुलडाणा तालुक्यातील भादोला येथे लोकवर्गणीतून कोरोना आयसोलेशन सेंटर कार्यान्वित झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी भादोला ग्रामस्थांचे कौतुक करत गावागावात लोकसहभागातून आयसोलेशन सेंटर उभे करण्यासाठी नागरिकांनी पुढे आले पाहिजे, असे प्रतिपादन केले. यावेळी श्री. तुपकर म्हणाले की,  केवळ प्रशासन आणि शासकीय यंत्रणेवर विसंबून न राहता गावातील नागरिकांनी एकमेकांना आधार देण्यासाठी, मदतीसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. कोरोनाचे हे संकट परतवून लावण्यासाठी पक्ष, धर्म, जात, मतभेद विसरून इतर गावातील राहिवासीयांनी देखील पुढे येण्याचे आवाहन श्री. तुपकर यांनी केले, सूत्रसंचालन संदीप चव्हाण यांनी केले, शिवराजे ग्रुपने केंद्राची साफसफाई केली.

काय आहे केंद्रात..?

या विलीगीकरण कक्षात विविध सुविधा उपलब्ध आहेत. येथे नियमितपणे आरटीपीसीआर, रॅपिड चाचण्या करण्यासोबतच संशयित व बाधितांवर उपचार केले जातील. शिवाय लसीकरणावर देखील भर दिला जाईल. प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती सर्व मदत या आयसोलेशन सेंटरला केली जाईल.