स्‍पॉट रिपोर्ट ः चौघांच्‍या विष प्राशनाचे “गौडबंगाल’ शोधण्यासाठी Buldana Live टेंभीत!; धक्‍कादायक गोष्टी आल्या समोर!!

बुलडाणा (टीम बुलडाणा लाइव्ह : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दोन चिमुकल्यांसह विवाहितेने आणि गावातीलच एका अल्पवयीन मुलाने एकाच घरात विष घेतले. यातील एका चिमुकल्यासह विवाहितेचा मृत्यू झाला. या घटनेने अवघा जिल्हा हादरला. चौघांनी विष का घेतले इथंपासून सुरू झालेली चर्चा, अफवांच्या बाजाराने आणखीच पेट घेत राहिली. आजही या अफवांची धग काही कमी झाली नव्हती. अशा …
 

बुलडाणा (टीम बुलडाणा लाइव्ह : बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः दोन चिमुकल्यांसह विवाहितेने आणि गावातीलच एका अल्पवयीन मुलाने एकाच घरात विष घेतले. यातील एका चिमुकल्यासह विवाहितेचा मृत्‍यू झाला. या घटनेने अवघा जिल्हा हादरला. चौघांनी विष का घेतले इथंपासून सुरू झालेली चर्चा, अफवांच्‍या बाजाराने आणखीच पेट घेत राहिली. आजही या अफवांची धग काही कमी झाली नव्‍हती. अशा प्रसंगी सत्‍य जाणून घेण्यासाठी बुलडाणा लाइव्‍हने गाठले मोताळा तालुक्‍यातील टेंभी गाव. अवघ्या गावाला या घटनेने धक्‍का बसला आहे. वृत्तपत्रांत छापून आलेल्या बातम्‍यांमुळे ग्रामस्‍थांत संतापही आहे. असं का घडलं, याचे उत्तर आजही गावात नव्‍हते, होती फक्‍त चर्चा… याही स्‍थितीत बुलडाणा लाइव्‍हच्‍या चौकशीत अनेक धक्‍कादायक अशा बाबी समोर आल्या आहेत…

चार जुलैच्या मध्यरात्री टेंभी येथील सौ. वृषाली समाधान तायडे (३०), अनुभव समाधान तायडे (६) यांचा विष प्राशनाने मृत्यू झाला होता तर वैभव समाधान तायडे (११) आणि एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर मलकापूरला खासगी रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत.

मृतक वृषालीचे गावातीलच एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलासोबत गेल्या सहा महिन्यांपासून प्रेमसंबध होते. याबद्दल वृषालीच्या सासू आणि दिराने वृषालीला आठ दिवसांपूर्वीच विचारणा केली असता तिचे सासू आणि दिरासोबत भांडणही झाले होते. माझे कुठेही संबंध नाहीत, असे ती घरच्यांना ठणकावून सांगत होती. यातच वृषालीच्या पतीचाही तिच्‍यावर मोठा विश्वास असल्याने त्‍याचाही आईसोबत माझी पत्नी “तशी’ नाही म्हणून वाद झाला होता. अल्पवयीन मुलगा गावातच शेती आणि क्रेन मशीनचे काम पाहतो. वहिनी वहिनी म्हणता म्हणता त्याचे वृषालीसोबत प्रेमसंबंध तयार झाले. ४ जुलैच्या रात्री तिचा पती समाधान आणि सासरे शेतात हरणापासून पिकांचे रक्षण करण्यासाठी गेले होते. घरासमोर अंगणात खाट टाकून सासू झोपली होती. याच संधीचा फायदा घेत १७ वर्षीय अल्पवयीन प्रियकर त्यांच्या घरात घुसला. ही बाब अंगणात झोपलेल्या सासूच्या लक्षात आल्याने सासूने शेजारीच राहणारा पुतण्या युवराज तायडे याला बोलावून घेतले. ही बाब गावातील ज्‍येष्ठांच्‍या कानावर घालावी म्हणून युवराजने गावचे सरपंच आणि पोलीस पाटलांना बोलावून घेतले. सरपंच आणि पोलीस पाटील यांनी बुलडाणा लाइव्‍हला सांगितल्यानुसार, ते आले तेव्हा घरातील लाईट बंद होता. घराला आतून कडी लावलेली होती. खिडकीतून आवाज देऊनही आतून उत्तर येत नव्हते. मात्र विषारी औषधाचा वास येत असल्याने पोलीस पाटलांनी ही बाब धामणगाव बढे पोलीस ठाण्याच्‍या ठाणेदारांच्या कानावर घातली. ठाणेदारांनी दरवाजा तोडण्याचा आदेश दिला. दरवाजा तोडला तेव्हा घरातील तिघे मायलेक व १७ वर्षीय अल्पवयीन प्रियकर गंभीर अवस्थेत होते. ही बाब वृषालीच्‍या पती आणि सासऱ्यांना कळविण्यात आली. विष प्राशन केलेल्या चौघांनाही लगेच मलकापूरला हलविण्यात आले. मात्र वाटेतच वृषाली आणि तिच्‍या सहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. वैभव समाधान तायडे (११) आणि १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर सध्या उपचार सुरू आहेत. बदनामी होईल या भीतीपोटीच अल्पवयीन प्रियकर आणि वृषालीने विष घेऊन दोन्ही मुलांनाही विष पाजले, अशी चर्चा गावात सुरू आहे.

घटनेच्या दिवशी दोन्ही चिमुरड्यांनी शेतात केली मदत…
घटनेच्या दिवशी चार जुलैला दुपारी शेतात अनुभव आणि समाधान तायडे या दोन्ही मुलांनी शेतकामात मदत केली. त्याचे व्हिडिओही काढले. अनुभव हा दुसऱ्या तर वैभव पाचव्या वर्गात शिकत होता. दोघांच्याही शिक्षणासाठी वडील समाधान तायडे यांनी अँड्रॉइड फोन घेतला होता.

खरे काय “त्या’ दोघांनाच माहीत!
या घटनेतील १७ वर्षीय अल्पवयीन प्रियकर आणि वृषालीचा मोठा मुलगा वैभव सध्या उपचार घेत आहेत. अल्पवयीन प्रियकर घरात एवढ्या रात्री कशाला आला? दोघांच्या मध्ये वैभव आणि अनुभवला विष कुणी पाजले? नेमके काय घडले हे त्या दोघांनाच माहित, असे ग्रामस्‍थांशी चर्चेत सांगितले.

घटना गुंतागुंतीची; सध्या काहीच सांगता येणार नाही…
टेंभी गावात घडलेली घटना दुर्दैवी आहे. यात दोन मायलेकांचा मृत्यू झाला. दोघे मृत्यूशी झुंज देत आहेत. प्रकरण अतिशय गुंतागुंतीचे आहे. सध्या घटनेशी संबंधित सर्वांचे बयाण घेतले जात आहेत. चौकशीतून प्रकरणाचे नेमके सत्य समोर येईल.

– चंद्रकांत ममताबादे, ठाणेदार, धामणगाव बढे