स्‍मशानभूमीत प्रेत जागवणाऱ्या तीन मांत्रिकांना झारखंडमधून आणले पकडून; व्यापारी आशिष गोठीलाही अटक, मलकापुरात घडला होता अघोरी प्रकार

मलकापूर (गजानन ठोसर ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : स्मशानभूमीत दिवे लावून मंत्रोच्चार करत प्रेत जागृतीचा अघोरी प्रकार करणाऱ्या आयोजकासह तीन मंत्रिकांना मलकापूर पोलिसांनी काल, २० जुलै रोजी अटक केली. वडील आणि भावाच्या आत्मशांतीसाठी मलकापुरात खास झारखंडमधून मांत्रिकांना पाचारण करून स्मशानभूमीत अमावस्येला रात्रीच्या अंधारात दिव्यांची आरास मांडून पूजा अर्चा केल्याने शहरातील स्मशानभूमी परिसरातील नागरिक अक्षरशः घाबरून …
 

मलकापूर (गजानन ठोसर ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : स्मशानभूमीत दिवे लावून मंत्रोच्चार करत प्रेत जागृतीचा अघोरी प्रकार करणाऱ्या आयोजकासह तीन मंत्रिकांना मलकापूर पोलिसांनी काल, २० जुलै रोजी अटक केली. वडील आणि भावाच्या आत्मशांतीसाठी मलकापुरात खास झारखंडमधून मांत्रिकांना पाचारण करून स्मशानभूमीत अमावस्येला रात्रीच्या अंधारात दिव्यांची आरास मांडून पूजा अर्चा केल्याने शहरातील स्मशानभूमी परिसरातील नागरिक अक्षरशः घाबरून गेल्याचा प्रकार ९ जुलैच्या रात्री घडला होता. या प्रकरणात जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील सर्व आरोपी फरारी झाले होते. यातील तिघा मांत्रिक आरोपींना झारखंड येथून तर आयोजक आशीष गोठी याला मलकापूर पोलिसांनी ताब्यात घेतले. आज, २१ जुलै रोजी न्यायालयासमोर चौघांनाही उभे केले असता न्यायालयाने त्यांना पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मलकापूर शहरातील माता महाकाली परिसरातील रहिवासी आशिष अशोक गोठी (४२) या युवकाच्या वडिलांचे आणि भावाचे निधन काही महिन्यांपूर्वी झाले होते. त्यांची आत्मशांती झाली नाही म्हणून त्यांच्या घरात शांतता भंग पावली असा त्यांचा समज होता. त्यावर उपाययोजना म्हणून आशिषने अमावस्येला तीन मांत्रिकांना स्मशानभूमीत पाचारण करून प्रेत जाळतात त्याठिकाणी मांत्रिकांच्या उपस्थितीत दिव्यांची आरास मांडली होती. मंत्रोच्चार करून प्रेत जागृतीचा अघोरी प्रकार या ठिकाणी सुरू होता. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली असता नागरिकांनी स्मशानभूमीत एकच गर्दी केली होती. या प्रकरणात मलकापूर शहर पोलिसांनी आशिष अशोक गोठी (रा. माता महाकालीनगर, मलकापूर), मांत्रिक विनोद कुमार पन्नालाल श्रीवास्तव (६९, रा. बागबेडा कॉलनी, टाटानगर पूर्वी सिंहगड झारखंड), सुदर्शन नारायण चंद्र उपाध्याय (६६ रा. बागबेडा कॉलनी, टाटानगर), अभिषेक छोटराम हेमकूम (३७, रा. छोलागोडा, बारेगोडा पो. परसोडी सरजामरा झारखंड) या चौघांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. मलकापूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रल्हाद काटकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय ठाकरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश रोकडे, ना.पो.काँॅ शरद मुंडे यांनी आरोपींना अटक केली.